बुलढाणा : चिखली-मेहकर रोडवर खैरव फाट्याजवळ आज बुधवारी दुपारी भीषण अपघात झाला. माल वाहक वाहन (ट्रक), डस्टर कार आणि दुचाकीच्या तिहेरी धडकेत तिघांचा मृत्यू झाला. या भीषण वाहन दुर्घटनेने चिखली तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

चिखली पोलीस ठाण्याचे  ठाणेदार संग्राम पाटील आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्यात व्यस्त आहेत. सविस्तर माहिती अजून प्राप्त झालेली नाही. दुर्घटनेची प्राप्त प्राथमिक माहितीनुसार भरधाव ट्रकने डस्टर कारला जबर धडक दिली. याच वेळी दुचाकी या दोन्ही वाहनांमध्ये सापडल्याने तिचा अक्षरशः चुराडा झाला. दुचाकीवर असलेल्या अंदाजे ४५ वर्षीय महिला आणि सुमारे १६ वर्षीय युवक यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेत असलेला युवकाला उपचारासाठी चिखलीच्या डॉक्टर जवंजाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यालाही मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांनी वाहनात अडकलेल्या मृतदेह वा गंभीर जखमीस बाहेर काढले. अपघातमुळे ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. हे वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप जीवांचा बळी गेल्याची चर्चा आहे.

खासगी बसच्या अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील प्रवासी जखमी

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरजवळ सुरतहून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरकडे जात असलेली खासगी आराम बस मालमोटारीला धडकल्याने दोन जणांचा मृत्यू आणि २४ प्रवासी जखमी झाले. ही घटना आज बुधवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास घडली. खासगी आराम बस प्रवाशांना घेऊन सुरतहून मेहकरकडे निघाली होती. मुक्ताईनगरजवळ  बस महामार्गावर उभ्या असलेल्या मालमोटारीला जाऊन धडकली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात  बुलढाणा जिल्ह्यातील कमी अधिक विस जणांचा समावेश आहे. त्यामध्ये लता देवघामे (४९), शालीग्राम देवघामे (६०), ऋषिकेश देवघामे (३०, रा.वरवंड तालुका मेहकर ), जयसिंग शिरसाठ (७०), राधा शिरसाठ (६०), आनंदा शिरसाठ (२४, रा. दादुलगव्हाण), गजमल आढाव (४२), वर्षा आढाव (४२, रा. लासुरा ), मोहंमद अफरोज (३९), कैलास गुजर (५२, रा. रोहिणखेड तालुका मोताळा ), सलीमा शेख (४५), सानिया शेख (१९, रा. डोणगाव तालुका मेहकर ),  आवेश शहा (१६), जैगून शहा (६०, रा. मोताळा), बब्बू शहा (५७, रा, बुलढाणा), गोविंदा गुंड (३०,रा. चिखली), उषा तायडे (५९, रा. रूईखेड मायंबा तालुका बुलढाणा), उदय शेळके (४१, रा. सारोळा ता मोताळा )यांचा समावेश आहे.