भंडारा : कारधा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आश्रय बाल सुधार गृहातून तीन अल्पवयीन मुलींनी पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. याच सुधारगृहातून यापूर्वीही मुलींनी सुरक्षा भिंत ओलांडून पळ काढला काढल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे बाल सुधारगृहाच्या कारभाराविषयी आणि सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कारधा पोलीस मुलींचा शोध घेत आहेत.
विविध गुन्ह्यांमध्ये दाखल असलेल्या अल्पवयीन मुला मुलींना अटक करता येत नसल्याने पुढील कायदेशीर कारवाई होत नाही अशा बाल गुन्हेगारांना सुधार गृहात ठेवले जाते. भंडारा तालुक्यातील आमगाव येथे असे आश्रय बालसुधारगृह आहे. या बालसुधार गृहात २५ मुलमुली राहतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या किंवा विविध गैरप्रकरणातून सुटका करून आणलेल्या १८ वर्षांखालील मुलामुलींना येथे आश्रय दिला जातो.
दरम्यान १ फेब्रुवारी रोजी रात्रीचे जेवण झाल्यानंतर सर्व मुली आपापल्या खोलीत झोपण्यासाठी गेल्या. मध्यरात्रीच्या सुमारास सर्वजण गाढ झोपी गेलेले असताना सुधार गृहातील तीन मुलींनी सुरक्षा भिंत ओलांडून सुधार गृहातून पळ काढला. दुसऱ्या दिवशी या तीन मुली सुधार गृहात नसल्याचे पाहून प्रशासन खळबळून जागे झाले. तिघींचाही शोध घेण्यात आला मात्र त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही त्यानंतर कारधा पोलिसात या संबंधित तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार दाखल होताच ठाणेदार गोकूल सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार कांचन टेंभूर्णे, विकास जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करून पळून गेलेल्या मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे पालकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील वर्षी देखील २ मुले पळाले होते
२ जानेवारी २०२५ रोजी देखील या सुधारगृहातून दोन अल्पवयीन मुले पळून गेली होती. कारधा पोलिसांनी तातडीने तपास करित एकाला गुजरातमधील अहमदाबाद आणि तर दुसऱ्याला गोंदिया येथून ताब्यात घेत आश्रय बालसुधार गृहात सुरक्षितपणे सोपविले होते.
नेमके कारण काय ?
बालसुधारगृहात गृहातून मुलांनी वारंवार पळून जाणे हे अत्यंत गंभीर असून याची नेमकी कारणे काय याचा शोध घेणे गरजेचे आहे. मुलांना या ठिकाणी मिळणारी वागणूक, व्यवस्था, याशिवाय सुरक्षा यंत्रणा या सर्वांवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सुरक्षा रक्षक काय करत होते?
सुरक्षा यंत्रणा बाल गुन्हेगारांच्या सुरक्षिततेसह आवारातील सुरक्षेवर लक्ष केंद्रित करते. त्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते का? प्रशिक्षित सुरक्षा रक्षक, कडक तपासणी, आणि आणीबाणीच्या परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष सुरक्षा रक्षक नव्हते का असे प्रश्न उपस्थित होत आहे.
सुरक्षेत सुधारणा गरजेची
बालसुधारगृहांची सुरक्षा ही मुलांच्या काळजी, पुनर्वसन आणि विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, जिथे हिंसामुक्त, कायदेशीर आणि पोषक वातावरण मिळणे हा त्यांचा हक्क आहे आहे मात्र, अशा घटनांमुळे या संस्थांच्या अंतर्गत कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मुलांचे पळवून जाणे किंवा अत्याचाराचे प्रकार रोखण्यासाठी सुरक्षेत सुधारणा गरजेचे झाले आहे.

