चंद्रपूर : ‘गुड टच, बॅड टच’, पॉक्सो कायदा आणि सायबर गुन्हेगारीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी तुकूम येथील मातोश्री विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील तीन अल्पवयीन विद्यार्थिनी अचानक बेपत्ता झाल्याने चंद्रपूर शहरात खळबळ उडाली आहे. तिन्ही विद्यार्थिनी शाळेतील काही विद्यार्थ्यांसोबत गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. दरम्यान, तिन्ही मुलींचे ‘लाइव्ह लोकेशन’ छत्तीसगडमधील डोंगरगड येथे मिळाल्याची प्राथमिक माहिती असून, या दिशेने दुर्गापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.
जिल्हा पोलीस दलाच्या दामिनी पथकासह दुर्गापूर पोलिसांकडून नुकतेच विद्यालयात विद्यार्थिनींसाठी विशेष जनजागृती व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात पॉक्सो कायदा, ‘गुड टच, बॅड टच’, सायबर गुन्हेगारी तसेच संकटाच्या प्रसंगी पोलिसांची मदत कशी घ्यावी, याबाबत विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली होती. मात्र, या उपक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी तीन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याने पालकांची चिंता अधिकच वाढली आहे.
ऑटो न आल्याने वडिलांनी शाळेत सोडले
मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही विद्यार्थिनी चंद्रपूर शहरातील एका वस्तीत राहतात. त्या दररोज ऑटोने शाळेत ये-जा करीत होत्या. घटनेच्या दिवशी नेहमीचा ऑटो उपलब्ध झाला नाही. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी स्वतः तिन्ही मुलींना शाळेत सोडले.
सायंकाळी शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे ऑटोचालक मुलींना घेण्यासाठी शाळेत पोहोचला. मात्र, तिन्ही विद्यार्थिनी शाळेतून घरी गेल्याचे त्याला सांगण्यात आले. त्यानंतर ऑटोचालकाने ही माहिती कुटुंबीयांना दिली. घरी पोहोचल्यानंतरही मुली आढळून न आल्याने पालकांची धावपळ सुरू झाली.
नातेवाईक, मित्र-मैत्रिणींकडे शोध
मुलींचा ठावठिकाणा लागतो का, यासाठी कुटुंबीयांनी नातेवाईक, परिचित तसेच त्यांच्या मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली. मात्र, कुठेही माहिती मिळाली नाही. अखेर चिंताग्रस्त पालकांनी दुर्गापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला. तिन्ही विद्यार्थिनी नेमक्या कोणासोबत गेल्या, त्या स्वेच्छेने गेल्या की त्यांना कोणी प्रवृत्त केले, तसेच त्यांना कुठे नेण्यात आले आहे का, यासह विविध शक्यता तपासल्या जात आहेत.
डोंगरगडपर्यंत तपासाची दिशा
दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांच्या माहितीनुसार, तिन्ही विद्यार्थिनींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. तिन्ही मुलींचे ‘लाइव्ह लोकेशन’ छत्तीसगडमधील डोंगरगड येथे मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाला वेग दिला असून, संबंधित ठिकाणी शोध घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.
विद्यार्थिनी सुखरूप परतण्याची पालकांना प्रतीक्षा
तिन्ही अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर चिंतेचे सावट पसरले आहे. मुलींचा शोध लवकर लागावा आणि त्या सुखरूप घरी परताव्यात, यासाठी पालकांसह परिसरातील नागरिकही प्रार्थना करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, मुलींच्या बेपत्ता होण्यामागील नेमके कारण आणि त्यांच्यासोबत कोण होते, याचा उलगडा तपासानंतरच होणार आहे.
