सरकारी वकील भारती डांगरे, अ‍ॅड. मनीष पितळे यांचाही समावेश

Police dressed as priests in Uttar Pradesh
अन्वयार्थ : पोलीस पुजारी.. की पुजारी पोलीस!
Mallikarjun Kharge criticizes Dalit oppression in Narendra Modi Maharashtra state
मोदींच्या राज्यात दलितांवर अत्याचार; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज

नागपूरकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी असून राज्याचे महाधिवक्ता रोहित देव यांच्यासह नागपूर खंडपीठातील सरकारी वकील भारती डांगरे आणि सर्वोच्च न्यायालयात वकील असलेले नागपूरकर अ‍ॅड. मनीष पितळे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात येत असून त्यांना वकिलीचा सराव करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या निबंधक कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे. लवकरच त्यांना अधिकृत नियुक्तीचे पत्र मिळणार असून पुढील शुक्रवापर्यंत त्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे.

मुंबई उच्च न्यायालयात ९४ न्यायमूर्तीची पदे मंजूर आहेत. त्यापैकी ७१ पदे ही नियमित न्यायमूर्ती आणि २३ अतिरिक्त न्यायमूर्तीची पदे असून ५५ नियमित न्यायमूर्ती कार्यरत आहेत. तर ६ अतिरिक्त न्यायमूर्ती काम करीत आहेत. त्यामुळे नियमित न्यायमूर्तीची १६ आणि अतिरिक्तची १७ पदे रिक्त आहेत. अशात अनेक वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात नवीन न्यायमूर्तीच्या भरतीची मागणी होती. आता कुठे त्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून नागपूरच्या तीन कायदेपंडितांसह मुंबईतील चार वकिलांची न्यायमूर्तीपदी निवड करण्यात आली आहे. एका महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुटय़ा संपायला काही कालावधी शिल्लक असून नवीन रोस्टर जाहीर करण्यापूर्वी नवनियुक्त न्यायमूर्तीना शपथ देऊन त्यांना वेगवेगळ्या खंडपीठात जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

अ‍ॅड. देव यांना ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी नागपूर विद्यापीठातून विधि अभ्यासक्रमाची पदवी घेतल्यानंतर १९८६ मध्ये वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनात वकिलीला सुरुवात केली. अतिशय शांत आणि सोज्वळ स्वभावामुळे ते ओळखले जातात. त्यांनी आजवर अनेक संवेदनशील प्रकरणे हाताळले असून राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर ते सहयोगी महाधिवक्ता झाले. त्यानंतर माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची महाधिवक्तापदी नियुक्ती करण्यात आली होती.

अ‍ॅड. भारती डांगरे यांनी नागपूर विद्यापीठातून विधि पदवी संपादन केली असून विधि पदवीमध्ये त्यांनी १२ सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. त्यांनी व्यावसायीक कायद्यात एलएलएम ही पदव्युत्तर पदवी संपादन केली आणि नागपूर खंडपीठात वकिलीला सुरुवात केली. त्या महिला चळवळीशीही जुळलेल्या होत्या. नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील, अतिरिक्त सरकारी वकील अशा भूमिकाही निभावल्या आहेत. त्यानंतर २०१४ मध्ये त्या सरकारी वकील झाल्या. आपल्या वकिलीच्या कार्यकाळात त्यांनी ४ गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात मोलाची भूमिका वठवली. तर अ‍ॅड. पितळे हे ४६ वर्षांचे आहेत. त्यांनी विधि पदवी संपादन केल्यानंतर माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांच्या मार्गदर्शनात नागपुरात वकिलीला सुरुवात केली. त्यानंतर ते दिल्ली येथे गेले. दिल्लीत त्यांनी अ‍ॅड. संघी यांच्यासेाबत काम केले आणि त्यानंतर स्वतंत्र काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक संवेदनशील प्रकरणे हाताळले असून त्यांना अनेक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. या नियुक्त्यांमुळे नागपूरच्या वकील संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नवीन महाधिवक्ता, सरकारी वकिलाचा शोध सुरू

महाधिवक्ता देव आणि सरकारी वकील डांगरे यांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यानंतर आता त्यांची पदे रिक्त झालीत. त्यामुळे दोन्ही पदांसाठी आता शोध सुरू झाला असून महाधिवक्ता पदासाठी वरिष्ठ अधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि वरिष्ठ अधिवक्ता राम आपटे यांची नावे चर्चेत आहेत. तर नागपूर खंडपीठातील सरकारी वकील पदासाठी अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांच्या नावाची चर्चा आहे.