वर्धा : एक साधा प्राणी तो काय, पण या बेडकाच्या हजारो प्रजाती भूतलावर सुखनैव नांदतात. हा उभयचर ( Amphibian ) प्राणी अन्न साखळीतील महत्वाचा घटक आहे. म्हणजे तो शेतातील पिकनाशक किडे कीटक खातो आणि त्याची संख्या वाढू नये याची काळजी साप घेतात. बेडूक हा सापाचे आवडते भक्ष्य. निसर्गात अद्याप विविध प्राणी, पक्षी आढळून येत असतात. तीच बाब बेडकाची. आता या प्रजातीत ३ नव्यांची भर पडली आहे.
१५ वर्षाची तपश्चर्या
बेडकाच्या ३ प्रजाती सापडण्याची बाब ऐतिहासिक म्हटल्या जात आहे. दिल्ली विद्यापीठातील जगप्रसिद्ध उभयचर शास्त्रज्ञ प्रा. एस. डी. बिजू ( Frogman of India ) यांच्या नेतृत्वातील पथकाने हा शोध लावला आहे. भारतातील कॅस्केड या प्रजातीच्या बेडकावर त्यांनी १५ वर्षाहून अधिक काळ संशोधन केले आहे. वृत्तसंस्थांशी बोलतांना ते म्हणाले की भारतातील ईशान्यकडील राज्ये ही आंतरराष्ट्रीय जैवविविधता हॉटस्पॉट असलेली २ प्रमुख केंद्र आहेत. या भागात अजूनही अनेक दुर्मिळ जीवसृष्टी अस्तित्व राखून आहेत.
खजिना झाला उघड
ईशान्येकडील निसर्गसंपन्न राज्यात हा खजिना उघडकीस आला आहे. भारताच्या ईशान्येकडील निसर्गसंपन्न राज्यांमध्ये जैवविविधतेचा एक अनोखा खजिना पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा होत आहे. संशोधकांच्या एका पथकाने त्रिपुरा, नागालँड आणि पश्चिम बंगालमधील वेगवान वाहत्या नद्यांच्या आणि ओढ्यांच्या भागात ‘कॅस्केड फ्रॉग’ (Cascade Frog) या बेडकांच्या तीन अगदी नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. या शोधमोहिमेतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे त्रिपुरातील जंपुई टेकड्यांमध्ये सापडलेल्या एका नवीन प्रजातीला केरळच्या प्रसिद्ध दिवंगत समाजसेविका पद्मिनी वर्की (Padmini Varkey) यांच्या सन्मानार्थ वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे.
समाजसेविकेचे दिले नाव
केरळमध्ये आपल्या सामाजिक आणि रुग्णसेवेच्या कार्यासाठी घरोघरी अत्यंत आदराने ओळखल्या जाणाऱ्या पद्मिनी वर्की यांना लोक प्रेमाने ‘अम्नाची’ (मळयालम भाषेत आई) म्हणत असत. त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाचा आणि स्मृतीचा सन्मान करण्यासाठी या नवीन बेडकाला ‘अमोलोप्स अम्नाची’ (Amolops ammachi) असे नाव देण्यात आले आहे. हा बेडूक मध्यम आकाराचा (सुमारे ८० मिमी लांब) असून त्याच्या फिकट तपकिरी पाठीवर ऑलिव्ह-ग्रीन (जैतुनी हिरव्या) रंगाची देखणी नक्षी आहे. वेगवान पाण्याच्या प्रवाहात खडकांवर मजबूत पकड धरून राहण्याची खास शारीरिक रचना या प्रजातीचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
नागालँड आणि पश्चिम बंगालमधील या शोधमोहिमेदरम्यान शास्त्रज्ञांना इतर दोन नवीन प्रजाती सापडल्या असून भारतातील ५ जुन्या प्रजातींची या भागात प्रथमच नोंद झाली आहे. अमोलोप्स सेंदैन्यु (Amolops Sendenyu): नागालँडमधील ‘सेंदैन्यु’ या गावाने वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनात आखलेल्या आदर्शाचा सन्मान म्हणून या बेडकाला या गावाचे नाव दिले गेले आहे. अमोलोप्स बेला (Amolops bella): पश्चिम बंगालमध्ये आढळलेला हा बेडूक आपल्या अत्यंत आकर्षक हिरव्या आणि पिवळसर-तपकिरी मोझॅक रंगाच्या नक्षीसाठी ओळखला जातो. या नव्या ३ प्रजाती भारताच्या वैविध्यपूर्ण निसर्ग संपत्तीचे द्योतक समजल्या जातात. आणखी नव्या जीवांचा शोध लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यासाठी आणखी सखोल अभ्यास करण्याची गरज पुढे आली आहे. पर्यावरण संपन्नता, महत्वाचीच अशी प्रतिक्रिया जीव शास्त्रज्ञ देतात.
