बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुका आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरील दुर्गम अशा गोमाल गावात अतिसारामुळे (डायरिया) तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये एका युवतीसह दोन बालकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. अनेक बाधित रुग्ण हे जळगाव जामोद व मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच जिल्हा आरोग्य विभागाची पथके आणि अधिकारी गावात दाखल झाले आहे. गावात व्यापक सर्वेक्षण आणि उपाययोजना करण्यात येत आहे.

आरोग्य यंत्रणांनी अद्याप अतिसारामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी केली नाही. शवविच्छेदन अहवालानंतर तिघांचे मृत्यू कशामुळे झाले, हे स्पष्ट होईल, असे जिल्हा आरोग्य यंत्रणांच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मृत्यूनंतर या तिघांचे मृतदेह झोळीत टाकून घरी न्यावे लागले. यामुळे गावकऱ्यांचा कुणीच वाली नाही, अशी बिकट स्थिती आहे.

हे ही वाचा…गडचिरोली : राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मुलगी विरुद्ध वडील राजकीय संघर्ष; आत्राम कुटुंबातील फुटीमुळे…

गोमाल हे गाव अतिशय दुर्गम भागात आहे. बुलढाणा जिल्हा व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरील या तांडावजा गावात आरोग्य, रस्ते, दळणवळणाची सुविधा उपलब्ध नाही. रस्ते नसल्याने अतिसारामुळे अत्यावस्थ रुग्णांना रुग्णालयात न्यायला विलंब झाल्याचे समजते. यामुळे सागरीबाई हिरू बामण्या (१८), जिया अनिल मुजालदा (२ वर्षे) आणि रविना कालू मुजालादा (५) यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांचे मृतदेह झोळीत टाकून तब्बल १५ किलोमीटर पायपीट करीत गावात न्यावे लागले. स्वातंत्र्यानंतरही या गावात रस्ते नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

आरोग्य पथक गावात

या रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप अस्पष्ट आहे. जळगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला पाटील यांनी मृत्यूचे नेमके कारण सांगण्यास असमर्थता दर्शविली. आरोग्य विभागाचे जिल्हा साथरोग अधिकारी डॉक्टर प्रशांत तांगडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनीही असमर्थता दर्शविली. आज संध्याकाळपर्यंत शवविच्छेदन अहवाल हाती येण्याची शक्यता डॉ. तांगडे यांनी बोलून दाखविली. यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. गावात आरोग्य विभागाची पथके दाखल झाली आहेत. आज अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारीदेखील गोमाल गावात दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. गावात व्यापक सर्वेक्षण करण्यात येत असून उपाययोजना करण्यात येत आहे. गोमाल परिसरात मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या असल्याने पथकाशी संपर्क साधण्यात मोठी अडचण येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गोमाल गावात अतिसाराची लागण झाल्यावरही बुलढाणा आरोग्य विभागाला याबाबत माहिती नसल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा…गोंदियाः पूर्व विदर्भात भाजप ला मोठा धक्का, माजी आमदार गोपालदास अग्रवाल कॉंग्रेसमध्ये परतणार

आणखी ३० रुग्ण आढळले

आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात गोमाल गावात अतिसाराची लागण झालेले आणखी ३० रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यातील १५ रुग्णांना उपचारासाठी जळगाव व अन्यत्र पाठवण्यात आले आहे, तर उर्वरित १५ रुग्णांवर गोमाल गावातच उपचार सुरू आहे. त्यासाठी गावातच कॅम्प तयार करण्यात आला असून वैद्यकीय पथकांच्या देखरेखीत रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांनी याला दुजोरा दिला. यामुळे गोमाल गावातील स्थिती गंभीर असल्याचे चित्र आहे.