लोकसत्ता टीम

अकोला: दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दाम्पत्यासह तीन जणांचा मृत्यू झाला. ही घटना अकोट-अंजनगाव मार्गावरील वाई फाट्याजवळ आज दुपारी घडली.

संजय रामदास मंजुळकर आणि शोभा संजय मंजुळकर असे मृत पती-पत्नीचे नाव आहे, तर दुसऱ्या दुचाकीवरील प्रणय हरिदास घट्टे (२४, रा.अंजनगांव, जि. अमरावती) असे तिसऱ्या मृतकाचे नाव आहे. पंकज बेलसरे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अकोट-अंजनगाव मार्गावर आज दुचाकी (क्र. एमएच २७ बीयु ४३९७) आणि दुसरी दुचाकी (क्र. एमएच २७ एस ८४६४) यांच्यात समोरासमोर जबर धडक झाली. या भीषण अपघातात पती-पत्नीचा आणि दुसऱ्या दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातात दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चुरडा झाला. अपघातानंतर स्थानिकांनी अपघातग्रस्तांना अकोट ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले, तर एकावर उपचार सुरू आहेत.

अकोट येथील मंजुळकर दाम्पत्य एका विवाह सोहळ्यानिमित्त आपल्या दुचाकीने जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. अकोट ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.