गोंदिया : गोंदिया तालुक्यातील ग्रामपंचायत लईटोला जवळील पगारटोला येथील तुरकर कुटुंबीय यांच्याकडे पिंडदान करिता आल्या होत्या. यातील तीन महिलांचा बाघ नदीतील कोरणी घाटात आंघोळ करीत असताना पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार ८ जून रोजी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास घडली. मीनाक्षी संतोष बघेले (३९), नीतू शत्रुधन बघेले (३५), मीराबाई इशुलाल तुरकर (५०) सर्व राहणार नागपूर, असे या घटनेतील मृत महिलांचे नाव आहे.

गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत लईटोला जवळील पगारटोला येथील तुरकर कुटुंबीय यांच्याकडे मुकेश तुरकर यांचा ३० मे २०२५ रोजी मृत्यू झाला होता. त्याचे पिंडदान करण्याकरिता तुरकर कुटुंबीय व त्यांचे जवळील नातेवाईक रविवार ८ जून रोजी दुपारी गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या कोरणी घाट येथे आले होते.

पिंडदानची संपूर्ण पूजा अर्चा संपल्यानंतर तुरकर कुटुंबीय बाग नदीच्या नदीपात्रात आंघोळी करिता उतरले असता नदीपात्रातील दगडावरून पाय घसरल्यामुळे नीतू शत्रुधन बघेले ही पाण्यात बुडत असताना तिला वाचवण्याकरिता मीनाक्षी संतोष बघेले ही गेली. ती पण बुडू लागली तिला वाचविण्याकरिता मीराबाई इशुलाल तुरकर ही पण धावली असता या तिघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या महिला पाण्यात बुडत असताना त्यांना वाचवायला आणखी एक महिला धावली पण तिला त्यांच्याच एका नातेवाईकाने नदीपात्रात उडी घेऊन वाचविले. लगेच याबाबतची माहिती रावणवाडी पोलिसांना देण्यात आली दरम्यान नदीपात्रात लोकांनी गर्दी केली होती. रावणवाडी पोलीस घटनास्थळी पोहोचून उपस्थित असलेल्या लोकांच्या मदतीने तिने महिलांचे मृतदेह नदीपत्रातून बाहेर काढले. महिलांचे मृतदेह उत्तरीय तपासणी करिता गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. या प्रकरणाची पोलीस स्टेशन रावणवाडी येथे नोंद करण्यात आली असून पुढील तपास रावणवाडीचे पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात केली जात आहे.