यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ऊन, सावलीचा खेळ सुरू आहे. आज गुरूवारी सकाळी तापमानात दररोजपेक्षा अधिक वाढ झाली. पारा चढला असताना सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले आणि उकाड्याने त्रासलेल्या यवतमाळकरांना पावसाने चिंब केले. निम्मे शहर पावसाने भिजले, निम्मे कोरडे होते. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे ढग दाटले आहे. त्यामुळे तापमानात किंचित घट झाली तरी उकाडा कायम होता.
जिल्ह्यात काही तालुक्यात वादळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र यवतमाळ शहरात अद्याप पाऊस कोसळला नव्हता. आज गुरूवारी सकाळी सूर्य आग ओकत असताना अचानक ढग दाटून आले आणि पावसाला सुरूवात झाली. यवतमाळ शहरातील अर्ध्या भागात जवळपास पाऊणतास मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. शहरात भूमिगत गटारांसाठी अनेक रस्ते फोडण्यात आले आहेत. पावसाळ्यापूर्वी हे रस्ते पूर्ववत करणे अपेक्षित असताना, कामे अर्धवट ठेवण्यात आली. आजच्या पावसाने या रस्त्यांची दैना झाली. नागरिकांना घरी जायलाही रस्ता उरला नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
नगर परिषदेने गटार व नालेसफाई केल्याचे सांगितले जात असले तरी आजच्या पावसाने हा दावा सुद्धा फोल ठरविला. शहरातील गटार व नाले सफाई योग्यरितीने झाली नाही. त्यामुळे अद्यापही वेळ गेली नाही, ही कामे प्रशासनाने करून घ्यावी, अशी आगावू सुचनाच आजच्या पावसाने दिल्याचे मानले जात आहे. यवतमाळ शहरात अनेक भागात पाऊस कोसळत असताना वडगावच्या पुढे आर्णी मार्गावर पाऊस कोसळलाच नाही. त्यामुळे अर्धे शहर पावसाने चिंब होत असताना अर्ध शहर पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र होते. स्थानिक आमदार, पालकमंत्री यांचा प्रशासनावर कोणताही वचक नसल्याने खोदून ठेवलेले रस्ते, पाईपलाईनची कामे, तुंबलेल्या नाल्या, शहरात सर्वत्र साचलेला कचरा या समस्यंनी शहरवासीयांचे जगणे कठीण झाल्याची प्रतिक्रिया जनमाणसातून व्यक्त होत आहे.
आज जवळपास पाऊणतास कोसळलेल्या पावसाने शहरालगत वाघापूर परिसरातील नवरंग पेपर मिलच्या मागील भागातील वस्ती पाण्याखाली आली. मान्सूनपूर्व पावसाने या संपूर्ण परिसरात पाणी साचले आणि अनेकांच्या घरात पाणी शिरले. शहरात सद्यस्थितीत नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाल्यांची व सांडपाणी व्यवस्थापनाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी तुंबून घरात शिरते. हाच प्रकार या भागात घडला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे न केल्यास नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सचिन मनवर यांनी दिला आहे.