भंडारा : विकासाच्या घोषणा आणि कोट्यवधी रुपयांच्या योजनांची आकडेवारी कागदावर झळकत असताना दुसरीकडे मात्र भंडारा तालुक्यातील तिड्डी–मानेगाव हा महत्त्वाचा संपर्क मार्ग मागील दोन दशकांपासून अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात अडकला आहे. सुमारे २० ते २२ वर्षांपासून या रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर जिल्हाधिकारी तसेच पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अभियंत्याकडे धाव घेत तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे.

भंडारा तालुक्यातील तिड्डी–मानेगाव हा महत्त्वाचा संपर्क मार्ग मागील २० ते २२ वर्षांपासून दुरुस्तीअभावी अत्यंत दयनीय अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शेतमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांचे शिक्षण, नागरिकांची दैनंदिन ये-जा आणि आपत्कालीन सेवांसाठी याच रस्त्यावर अवलंबून राहावे लागते. मात्र सुमारे वीस वर्षांपूर्वी या मार्गाचे डांबरीकरण झाल्यानंतर त्याच्या नूतनीकरणाचा विषयच जणू प्रशासनाच्या फाईलमधून गायब झाला. परिणामी आज संपूर्ण रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी विदीर्ण झाला असून पावसाळ्यात त्याचे रूपांतर चिखलाच्या दलदलीत होत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समस्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, भंडारा यांच्याकडे निवेदन सादर करून तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.

तिड्डी–मानेगाव बाजार या रस्त्याचे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे २० वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्याची कोणतीही मोठी दुरुस्ती किंवा नूतनीकरण झाले नसल्याने संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

यापूर्वी ग्रामपंचायती मार्फत तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला होता. मात्र, मुसळधार पावसामुळे तो वाहून गेल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचे याकडे लक्ष नसून कुंभकर्ण झोपेत असल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले आहे. या समस्येबाबत वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत तसेच रस्त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण करण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करून काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.