भंडारा : सर्वत्र दिवाळीचा उत्साह, घराघरांत दिव्यांची रोषणाई आणि फराळाची लगबग सुरू असतानाच लाखांदूर तालुक्यातील दोनाड गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेतात आई-वडिलांसोबत गेलेल्या पाच वर्षीय मोक्ष बुरडे याच्यावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. गुरुवारी (५ नोव्हेंबर) दुपारी घडलेल्या या घटनेत वाघाने चिमुकल्याला सुमारे २०० मीटर अंतरापर्यंत ओढत नेले. दिवाळीच्या सणाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, बुरडे कुटुंबाचा आनंद क्षणात शोकात बदलला आहे.

दोनाड येथील शेतकरी सचिन दयाराम बुरडे (४५) यांची दोन एकर शेती आहे. गुरुवारी पावसाळी धानाची कापणी झाल्यानंतर शेतात धानाचा पुंजना करण्यासाठी ते पत्नी सोनाली यांच्यासह गेले होते. दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने त्यांची दोन्ही मुले नक्षत्र (१०) आणि मोक्ष (५) दुपारी तीनच्या सुमारास आई-वडिलांकडे शेतात आली होती. आई-वडील कामात व्यस्त असतानाच शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक मोक्षवर झडप घातली. काही कळण्याच्या आतच वाघाने त्याला पकडून शेतातून सुमारे २०० मीटर अंतरावर ओढत नेले.

वडिलांच्या डोळ्यांदेखत काळाचा घाला

आपल्या पोटच्या गोळ्यावर वाघाने हल्ला केल्याचे पाहताच सचिन बुरडे यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. काही अंतरावर मोक्षचा मृतदेह आढळून आला. वाघाने गळ्याचा भाग पकडल्याने त्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. ज्या वयात चिमुकल्याच्या हातात दिवाळीचे फटाके आणि फराळ असायला हवा होता, त्याच वयात त्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

वनविभाग, पोलिसांकडून पंचनामा

घटनेची माहिती मिळताच लाखांदूर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटील भारती रामलाल नागोसे आणि सरपंच शिवदास बुरडे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

या घटनेमुळे परिसरात वाघाच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बुरडे कुटुंबाला शासनाने तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी, तसेच परिसरात वाघाचा बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.