सह्य़ाद्रीच्या दक्षिण वनक्षेत्रांत वाघांचा अधिवास

कोल्हापूर जिल्ह्य़ातील चंदगड संवर्धन राखीव वनक्षेत्रात वाघाचा अधिवास आढळून आला आहे.

चंदगड संवर्धन राखीव क्षेत्रात अस्तित्वाच्या पाऊलखुणा

नागपूर : कोल्हापूर जिल्ह्य़ातील चंदगड संवर्धन राखीव वनक्षेत्रात वाघाचा अधिवास आढळून आला आहे. या वनक्षेत्रात नुकतीच वाघाने शिकार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सह्य़ाद्रीच्या दक्षिणेकडील वनक्षेत्रांमध्ये वाघांचा अधिवास असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ हा दक्षिणेकडील कर्नाटकमधील अन्शी दांडेली, भीमगड, महाराष्ट्रातील तिलारी, दोडामार्ग, आजरा बुदारगड, चंदगड, विशालगडमार्गे उत्तरेत चांदोली व कोयनापर्यंत भ्रमण करीत आहे. डिसेंबर २०२० मध्ये राज्य सरकाराने पाच हजार ६९२ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या आंबोली-दोडामार्ग कॉन्झर्वेशन रिझव्‍‌र्ह; आणि २२ हजार ५२३ हेक्टर क्षेत्रावरील ‘चंदगड संवर्धन राखीव क्षेत्रा’ची घोषणा केली होती. त्यापूर्वी २९.५३ चौरस किलोमीटरच्या तिलारी संवर्धन राखीव क्षेत्राची स्थापना झाल्याने या भागातील वन्यजीवांचा भ्रमणमार्ग जोडण्यासाठी मदत झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या तिन्ही संवर्धन राखीव वनक्षेत्रांमध्ये वाघांचा अधिवास आहे. आंबोलीत यापूर्वी वाघांच्या पावलांचे ठसे आणि त्याने केलेल्या शिकारीचे अवशेष मिळाले आहेत. टाळेबंदीतही आंबोली परिसरात वाघाचे छायाचित्र कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाले होते. आता तिलारी आणि आंबोलीच्या वनक्षेत्रांनी जोडलेल्या चंदगड संवर्धन राखीव क्षेत्रात वाघाचा वावर निदर्शनास आला आहे. नुकतेच या ठिकाणी वाघाने रेडय़ाची शिकार केल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे वाघाच्या अधिवासावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे चंदगडचे परिक्षेत्र वनाधिकारी नंदकुमार भोसले म्हणाले.

भ्रमणमार्ग अखंड ठेवल्याने प्रजनन क्षेत्रातील वाघ व इतर तृणभक्षी प्राणी त्या क्षेत्राला जोडणाऱ्या इतर जंगलात आणि संरक्षित वनक्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र अधिवास निर्माण करू शकतात हे अधोरेखित होते.

डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर

सह्याद्री प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दल लवकर स्थापन करावे. संपूर्ण प्रदेश विशेष वाघ संरक्षण दलाच्या संरक्षण आणि रक्षणाखाली आणल्यास वन्यजीव गुन्हेगारी आणि बेकायदा खाणकाम नियंत्रित करण्यात मोठी मदत होईल.

रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक सातारा तथा सदस्य

वाघ आणि इतर मोठय़ा सस्तन प्राण्यांसाठी भ्रमणमार्गाची जोडणी महत्त्वपूर्ण आहे. सह्याद्रीच्या दक्षिणेकडील वनक्षेत्रांमध्ये वाघांचे अस्तित्व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अतिशय सकारात्मक आहे.

गिरीश पंजाबी, वाईल्डलाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tiger habitat southern forest sahyadri ysh

Next Story
नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदासाठी गडकरी-फडणवीस समर्थकांमध्ये चढाओढ
ताज्या बातम्या