लोकसत्ता टीम

नागपूर : बहेलिया शिकाऱ्यांच्या कितीही मुसक्या आवळल्या तरी ते सराईतपणे वाघांची शिकार करत आहे. गडचिरोलीसारख्या नक्षलवाद्यांचे वास्तव्य असलेल्या जिल्ह्यात देखील बहेलिया शिकाऱ्यांनी वाघांची शिकार करून अवयवांची तस्करी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, २०२३ मध्ये वाघांची शिकार केलेल्या फरार आरोपीपैकी पाच आरोपींना तब्बल पाच वर्षानंतर अटक करण्यात आली. यात एका महिला आरोपीचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यातून वाघाची शिकार करुन अवयवांची तस्करी करणाऱ्या पाच आरोपींना हरियाणातून अटक करण्यात आली. गडचिरोली वनविभागाने हरियाणात जाऊन ही कामगिरी केली.

गडचिरोली वनविभागाअंतर्गत चातगाव वनपरिक्षेत्रातील आंबेशिवणी नियतत्रोत्रातील राखीव कक्ष क्र. ४१२ व ४१३च्या सीमेत सापळे लावून दोन वाघांची शिकार करण्यात आली होती. या वाघ शिकारीत वाघाचे कातडे व १७ किलो हाडे हे गुवाहाटी येथे आसाम वनविभाग, पोलीस व वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने संयुक्त कार्यवाही करुन पाच आरोपींना अटक केली व गुन्ह्याची नोंद केली. जप्त केलेले वाघाचे अवयव हे गडचिरोली जिल्ह्यात शिकार करण्यात आलेल्या वाघांचे असलेले समजले. २३ जुलै २०२३ ला रात्री आंबेशिवणी गावात मुसाफिर म्हणून राहात असलेल्या हरियाणा व पंजाब राज्यातील लोकांच्या झोपड्यावर धाड टाकण्यात आली. पाच आरोपींना गुवाहाटीच्या कारागृहातून चौकशीसाठी ताब्यात घेतले व फरार आरोपी १७ होते. गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार व गडचिरोली वनविभीागाचे उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक अंबरलाल मडावी यांनी चातगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या नेतृत्त्वात मोहीम आखली.

मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार हरियाणा राज्यातील सोनीपट जिल्ह्यातील तेहाञबडोल या गावातून वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेचे वन्यजीव निरीक्षक डॉ. प्रगतिश यांच्यासोबत वनविभाग गडचिरोलीच्या चमुने संयुक्त कार्यवाही करुन फरार आरोपी सुमनदेवी ११ मार्च २०२५ ला अटक करुन गडचिरोली येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. १९ मार्चपर्यंत सात दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली. या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्के यांच्यासोबत वनपाल साईदास मडावी, वनपाल धनश्री दीकोंडावार, वनरक्षक हिना पदा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Story img Loader