लोकसत्ता टीम
नागपूर : राज्यात बहेलिया शिकाऱ्यांची धरपकड सुरू असतानाच नागपूर प्रादेशिक वनविभागाअंतर्गत खापा वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार उघडकीस आली. विशेष म्हणजे वाघाचे चारही पंजे, मिश्या आणि दात शिकाऱ्यांनी काढून नेल्याने खळबळ उडाली.
खापा वनपरिक्षेाअंतर्गत नागलवाडी वनवर्तुळअंतर्गत कोरमेटा नियतक्षेत्रातील मौजा सिरोंजी हद्दीत धनगाळा नाल्यामध्ये वाघ पडून असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी नागलवाडीचे वर्तुळ अधिकारी एस.डी. गडलिंगे यांना दुपारी दिली. माहिती मिळाल्यानंतर एस.डी. गडलिंगे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले व इतर वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेबाबत खात्री केली असताना त्याठिकाणी वाघ मृतावस्थेत असल्याचे त्यांना दिसून आले. यानंतर घटनेची माहिती नागपूर प्रादेशिकचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक व्ही.सी. गंगावणे यांना देण्यात आली.
मृत वाघाचे वय तीन ते साडेतीन वर्षाच्या दरम्यान असल्याचे निदर्शनास आले. तसेच वाघाचे चारही पंजे, मिश्या आणि दात शिकाऱ्यानी नेल्याचे आढळून आले. घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली असता परिसरातील ११ केव्हीच्या विद्युत वाहिनीवरुन लोखंडी तार व बांबु खुंट्यांचे सहाय्याने वन्यप्राण्यांची शिकार करण्याकरिता सापळा लावण्यात आला होता. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले.वाघाची शिकार विद्युत वाहिनीद्वारे करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. यावेळी तपासासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या श्वान पथकाची मदत घेण्यात आली.
वाघाचे शवविच्छेदन सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश फुलसुंगे, गोरेवाडा वन्यजीव बचाव व उपचार केंद्राचे डॉ. मयूर पावशे, पेंच व्याघ्रप्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मयंक बरडे यांनी केले. यावेळी उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक व्ही.सी. गंगावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. आठवले, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी म्हणून कुंदन हाते, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून मंदार पिंगळे तसेच स्थानिक जीवशास्त्र तज्ज्ञ श्रीकांत ढोबळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक नियमानुसार सर्व कार्यवाही करण्यात आली. वनगुन्ह्याच्या तपासणीकरिता मृत वाघांच्या शवविच्छेदनादरम्यान व्हिसेरा नमुने गोळा करण्यात आले. नागपूर येथील विभागीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यात येत असून घटनास्थळी आढळलेल्या साहित्याच्या आधारे व यापूर्वी वन्यजीव गुन्ह्यातील आरोपींच्या आधारे शिकाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी व तपास उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या माार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक व्ही.सी. गंगावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. आठवले करत आहेत. यावेळी खापा पोलीस ठाण्याचे अधिकारी श्री. गिरी, उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण अनिल मस्के हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी उपस्थित होते.