अमरावती : इंधन आणायला गेलेल्या एका आदिवासी गावकऱ्यावर वाघाने हल्ला चढवून त्याला ठार मारल्याची धक्कादायक घटना बुधवार, ४ जून रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागाच्या हरिसाल वनपरिक्षेत्रांतर्गत जंगल क्षेत्रात उघडकीस आली. वाघाने काही अवशेष सोडून संपूर्ण शरीर खाल्ल्याचे यावेळी दिसून आले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

मन्नू बाभल्या जावरकर (५५) रा. हरिसाल असे मृताचे नाव आहे. मन्नू हे सोमवार, २ जून रोजी इंधन आणण्यासाठी गुगामल वन्यजीव विभागांतर्गत हरिसाल वनपरिक्षेत्राच्या सेवरीमुंडा बिटमधील वनखंड क्रमांक ६४२ ला लागून असलेल्या जंगल क्षेत्रात गेले होते. त्यावेळी अचानक वाघाने मन्नू यांच्यावर हल्ला चढवून त्यांना ठार मारले. दरम्यान, मन्नू घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. अशात बुधवारी सकाळी गावाला लागून असलेल्या जंगल क्षेत्रामध्ये त्यांना मन्नू यांचे कपडे आणि अर्धवट अवस्थेमध्ये असलेले शिर दिसून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळल्यावर धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शेख गणी, मोहित आकाशे, जगत तेलगोटे यांनी जंगल क्षेत्रात मृत मन्नूच्या शरीराची हाडे व इतर अवशेष शोधून गोळा करीत घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मन्नू यांच्या शरीराच्या अवशेषांना उत्तरीय तपासणीकरिता धारणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यावर प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल दैय्यत, तारुबांदा वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश महल्ले यांच्यासह कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली. वनविभागाच्या पथकाने संपूर्ण परिसराची पाहणी केली. गेल्या काही वर्षात वाघाच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाघाला जेरबंद करण्याची मागणी

गेल्या दोन वर्षांत हरिसाल वनपरिक्षेत्राच्या जंगल क्षेत्रात चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांना वाघाने हल्ला करून ठार मारले आहे. त्यामुळे या घटनांना अनुसरून घटनास्थळी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी वनविभागाविरोधात प्रचंड रोष व्यक्त करीत वाघाला तत्काळ जेरबंद करण्याची मागणी रेटून धरली. मेळघाटात सहजासहजी वाघाचे दर्शन होत नाही. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघांचा वावर वाढला आहे. मानव वन्यजीव संघर्ष वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.