नागपूर : वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत माहुली नियतक्षेत्र सौंदड भाग-१, सहवनक्षेत्र सौंदड येथे एका वाघाने ६० वर्षीय महिलेवर हल्ला करून ठार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी शुक्रवार ३० जानेवारी रोजी घडली. या घटनेनंतर परिसरातील माहुली, बोपाबोडी, सिंदीपार परिसरात वाघाचे अस्तित्व दिसून येत होते. दरम्यान, या वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच आज, रविवार १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास सितेपार येथील एका शेतात त्या वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाच्या शिघ्र बचाव पथकाला यश आले आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील सितेपार येथे गजानन भोजलाल शरणागत यांच्या शेतात वन्यप्राण्याने शेळीची शिकार केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. यावर वन अधिकाऱ्यांनी मौका स्थळाची पाहणी केली असता, सदर शिकार वाघाने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शिघ्र बचाव दल, गोंदिया व शिघ्र बचाव दल नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखिव दल यांना पाचारण करण्यात आले. व वन्यप्राणी वाघाची ओळख पटविण्याकरीता कॅमेरा ट्रॅपद्वारे निरिक्षण करण्यात आले. निरिक्षणार्थी शेळीची शिकार करणारा व माहुली येथे लक्ष्मी हेमराज सयाम यांना ठार करणारा एकच वाघ असून सदर वाघ (मादी) असल्याचे निष्पन्न झाले.
सदर वाघ (मादी) मागील जवळपास १०-१५ दिवसापासून मानवी वस्ती तसेच शेती क्षेत्रालगत फिरत असल्याने भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेता प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य यांचे पूर्व परवानगीने राष्ट्रिय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार शिघ्र बचाव दल, गोंदिया व, शिघ्र बचाव दल नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखिव दल यांचेकडून सदर वाघाला (मादी) बेशुध्द करून यशस्वीरित्या रेस्क्यू करण्यात आले.
वाघाची गोरेवाड्यात रवानगी…
घटनास्थळी उपस्थित पशुवैद्यकिय अधिकारी नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्र यांचेकडून वाघाची (मादी) तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये वाघ (मादी) सुदृढ असल्याचे निष्पन्न झाल्याने वरिष्ठाचे पूर्व परवानगीने त्याला वन्यजिव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, गोरेवाडा प्रकल्प, नागपूर येथे पाठविण्यात आले.
यांनी बजावली कामगिरी…
सदरची मोहिम प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजिव) तथा मुख्य वन्यजिव रक्षक, नागपूर, तसेच मुख्य वनसंरक्षक, नागपूर, यांचे मार्गदर्शनात उपवनसंरक्षक, गोंदिया, सहायक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजिव) गोंदिया, वनपरिक्षेत्र अधिकारी, सडक अर्जुनी, शिघ्र बचाव दल, गोंदियातील अमोल चौबे, सतीश शेंदरे, विक्की ब्राम्हणकर, शुभम मेश्राम व शिघ्र बचाव दल नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखिव दलाचे आशिष रामटेके, प्रणित सुर, संकेत ठाकरे, नुतन बहेकार, तसेच पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. मेघराज तुलावी, नुर सैय्यद, जिवशास्त्रज्ञ शुभम मोडनकर, हर्षद रहांगडाले यांनी पार पाडली.

