गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्याच्या सभोवताली असलेल्या नवेगाव-नागझिरा क्षेत्र व्याघ्र प्रकल्पाच्या बफर परिसरातील गावांमध्ये वाघ आणि बिबट्याची दहशत अलीकडे अधिकच वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सायंकाळी पाचच्या आत शेतीकामे उरकावी लागत आहेत. इतकेच नव्हे, तर या परिसरातील गावे सायंकाळी सहालाच शांतता होत आहेत. गाव परिसरात अन्य वन्यप्राण्यांचाही वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी, सीतेपार, रेंगेपार, मालीजुंगा, धानोरी, मुरपार, लेंडेझरी, घटेगाव, सौंदड, बोपाबोडी, सिंदीपार, राका, कनेरी, मनेरी, बकी, कोकणा, मुरदोली, जांभळी, डव्वा, शेंडा आदी गाव परिसरात वाघ, बिबट्यांचा अलीकडे वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. लहान-मोठ्या पाळीव प्राण्यांची शिकार या हिंस्त्र प्राण्यांनी यापूर्वी केली आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील माहुली येथे वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पांढरी परिसरातील सीतेपार येथे वाघाने दोन बोकडांची शिकार केल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रानडुक्कर यापूर्वी शेतात नासधूस करत होते. परंतु, आता त्यांचा वावर गावापर्यंत वाढला आहे.
विशेषतः नीलगाय, सांभर, हरीण आदी प्राणी बहुतेक गावांतील शेतांमधील तूर, मूग, हरभरा पिकांवर ताव मारत आहेत. पीक नष्ट करत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. आता परिस्थिती अधिक गंभीर बनली असून, वाघ व बिबट्यांनी अनेक गावांमध्ये उच्छाद मांडल्याचे चित्र आहे. यामुळे शेतीच्या कामात अडचणी निर्माण होत आहेत.
शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या भीतीच्या सावटाखाली शेतीची कामे उरकावी लागतात. सायंकाळी पाचच्या सुमारास घराची वाट पकडावी लागत असून, सायंकाळी सहाच्या सुमारास लगतची गावे सामसूम होत आहेत.
वन्यप्राणी गावाकडे वळण्याची कारणे
शेतीसाठी जंगलावर होत असलेले अतिक्रमण, वृक्षतोड तसेच नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्यामुळे वन्यप्राण्यांना जंगलात अन्न व पाण्याची टंचाई भासत आहे. याशिवाय सडक अर्जुनी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकाऐवजी मका पिकाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. मका तसेच ऊस ही पिके उंच व दाट असल्याने बिबट्या व वाघाला लपण्यासाठी आणि हालचाली करण्यासाठी सुरक्षित ठिकाण ठरत आहेत. त्यामुळे हे प्राणी शेतांमध्येच तळ ठोकत असून, गावाजवळील मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे.
वनविभागाचे आवाहन
नवेगाव-नागझिरा क्षेत्र व्याघ्र प्रकल्पाच्या बफर परिसरातील गावांमध्ये वाघ आणि बिबट्या ग्रामस्थांना दिसून आले आहे करिता परिसरातील शेतकऱ्यांमध्ये वन विभागातर्फे जनजागृती करण्यात येत आहे. शेताचे नुकसान टाळण्यासाठी सोलर झटका मशीन, कुंपण आर्द योजना विभागाकडून राबविण्यात येत आहेत.
तसेच शेतकऱ्यांनी लहान मुलांना शेतात नेऊ नये, रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात जाऊ नये, अशा खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी, मिथुन तरोणे, यांनी केले.

