नागपूर : वाघांची संख्या वाढली, तुलनेने वाघांचा अधिवास कमी पडत आहे. यावर आता वनमंत्री गणेश नाईक आणि पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी तातडीने बैठक घेऊन तोडगा काढावा. नाही तर वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या लोकांचे प्रेत वनविभागाच्या कार्यालयात नेऊ आणि तेथेच ठाण मांडू, असा थेट इशाराच काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी दिला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात आठ दिवसात आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. आज झालेल्या घटनेनंतर विजय वडेट्टीवार चांगलेच संतापले. इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, वाघाच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू झाल्यानंतर पैसे देऊन जीव परत येतो का? पैसे देऊन लोकांचा जीव परत आणता येत नाही. पैशाने माणसाची किंमत मोजता येईल का? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
एवढेच आहे तर वनखात्यातील लोकांचा बळी द्या आणि त्यांना पैसे द्या. म्हणजे जीवाची किंमत कळेल. आता वाघ वाघ खूप झाले. त्यावेळी भाजपचे लोक रस्त्यावर उतरत होते. शोभाताई फडणवीस यांनी त्यावेळी वाघाच्या बंदोबस्तासाठी इशारे दिले होते. आता तोंडातून “ब्र” देखील काढत नाही. तोंड बंद झाले आहे का.? आता अभिमानाने मिरवतात की आमच्यामुळे वाघांची संख्या वाढली. माणसांचा जीव जातो आहे, करा ना आता वाघाचा बंदोबस्त. आता खूप झाले.
उद्याच वनमंत्र्यांना भेटणार आणि यावर तोडगा काढण्यास सांगणार. वाघ वाघ खूप झाले आता. वाढलेल्या वाघांच्या संख्येमुळे अधिवासाच्या समस्येवर वनमंत्री व पालकमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन तोडगा काढावा, नाही तर वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या लोकांचे प्रेत वनविभागाच्या कार्यालयात नेऊन ठाण मांडू असा इशाराच काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी दिला आहे.
आठ दिवसात वाघाच्या हल्ल्यात आठ जणांचा बळी गेल्याने सर्वत्र भीती व दहशतीचे वातावरण आहे. सध्या तेंदूपत्ता तोडणीचा हंगाम असल्यामुळे जंगलपरिसरात तेंदुपत्ता तोडणीसाठी गावकरी जात आहेत. सामान्यांसाठी तेंदूपत्ता तोडणीच्या वेळा निश्चित केलेल्या असताना नागरिक अधिक तेंदूपत्ता मिळावा यासाठी संध्याकाळी, रात्री.
वनविभागाने दिलेल्या वेळा डावलूनही जंगलात जात असल्याने वाघांच्या हल्ल्यात हकनाक जीव गमावत असल्याचे दिसून येत आहे. वन्य प्राण्यांचा अधिवास असणाऱ्या या जंगलांमध्ये नागरिकांनी दिलेल्या वेळेनंतर जाऊ नये यासाठी काहीतरी तरतूद करण्याची गरज असून नागरिकांवर होणाऱ्या वाघांच्या हल्ल्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.