नागपूर : काळोख दाटत चालला होता. लोहारा परिसरातील शेतांमध्ये गावकऱ्यांची गर्दी वाढत होती. एका विहिरीतून अधूनमधून डरकाळी ऐकू येत होती आणि प्रत्येकाच्या नजरा त्या विहिरीकडे खिळल्या होत्या. अखेर वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि सुरू झाला एका वाघाच्या जीव वाचविण्याचा थरारक संघर्ष. उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रातील लोहरा उपवनक्षेत्रात विहिरीत पडलेल्या वाघाला बुधवारी रात्री तब्बल काही तासांच्या प्रयत्नांनंतर सुरक्षित बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.
घटना काय नेमकी?
लोहरा उपवनक्षेत्रातील पांढरताल (रिठी) गावातील शेतकरी नारायण महादेव ढोंगे यांच्या शेतातील विहिरीत वाघ पडल्याची माहिती सायंकाळी सातच्या सुमारास गावकऱ्यांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी पी. डी. बाम्हे, सहाय्यक वनसंरक्षक मनोज धनविजय तसेच नागपूर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत विहिरीभोवती मोठी गर्दी जमली होती. विहिरीत अंदाजे एक वर्षांचा वाघ बछडा पाण्यात जीव वाचविण्यासाठी धडपड करत होता.
रेस्क्यू ऑपरेशन कसे?
सुरुवातीला वाघाला थोडा आधार मिळावा म्हणून वनकर्मचाऱ्यांनी विहिरीत लाकडी खाट सोडली. काही वेळाने दमलेला वाघाचा बछडा त्या खाटेवर जाऊन बसला आणि उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर बछड्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लोखंडी पिंजरा विहिरीत उतरवण्यात आला. मात्र घाबरलेला बछडा पिंजऱ्यात जाण्यास तयार नव्हता. प्रत्येक क्षण तणाव वाढवत होता. अखेर वनविभागाने वेगळी युक्ती वापरली. रेस्क्यू पथकाने खाट सावधपणे वर उचलण्यास सुरुवात केली. वर येत असताना बछडा अधिक चिडू नये याची विशेष काळजी घेतली जात होती. काही वेळाच्या थरारानंतर बछड्याला अलगद बाहेर काढण्यात आले आणि तत्काळ लोखंडी पिंजऱ्यात सुरक्षित बंद करण्यात आले. उपस्थित गावकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात वनकर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
बचाव मोहीम यशस्वी
यानंतर वाघाला तपासणीसाठी नागपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात आले. या संपूर्ण बचाव मोहिमेत वनविभागाचे अधिकारी, रेस्क्यू सेंटरचे कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली. उपवनसंरक्षक डॉ. विनीता व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक मनोज धनविजय, उत्तर उमरेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. डी. बाभळे यांच्यासह ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर, सेमिनरी हिल्स नागपूर येथील बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव मोहिमेत अमोल धुवे, मदन मोहटे, प्रतीक घाटे, सिद्धार्थ मोरे, प्रवीण मानकर, बंडू मंरग, चेतन बारस्कर, ओमप्रकाश मंरग यांच्यासह उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रातील व्ही. एम. आंबाडे, भांबोडे, मंगेश कोरे, रोहित लांजेवार आणि अन्य वनकर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
