३०० किमीचा प्रवास करून वाघ सह्याद्रीतून कर्नाटकात

राज्यातील सहा व्याघ्रप्रकल्पांपैकी पाच व्याघ्रप्रकल्प विदर्भात असून वाघांची सर्वाधिक संख्या देखील विदर्भात आहे.

अधिवास विकसित करण्यासाठी वनखात्याचा पुढाकार

नागपूर : सह्याद्री ते काली असा सुमारे ३०० किलोमीटरचा प्रवास करत वाघाने सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. या व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या कमी असल्याने इतर व्याघ्रप्रकल्पाच्या तुलनेत हा प्रकल्प दुर्लक्षित होता. मात्र, या स्थलांतरणामुळे सह्याद्रीत वाघांसाठी अधिवास विकसित करण्याकरिता राज्याच्या वनखात्याने पावले उचलली आहेत.

राज्यातील सहा व्याघ्रप्रकल्पांपैकी पाच व्याघ्रप्रकल्प विदर्भात असून वाघांची सर्वाधिक संख्या देखील विदर्भात आहे. विदर्भातील याच व्याघ्रप्रकल्पातून वाघांनी तीन हजार किलोमीटरपर्यंतचे स्थलांतरण करुन स्थलांतरणाचा इतिहास घडवला आहे. तुलनेने सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाचा विस्तार मोठा असला तरीही वाघांसाठी आवश्यक असा अधिवास विदर्भाच्या तुलनेत कमी पडत असल्याने याठिकाणी वाघांची संख्या देखील तोकडी आहे. मात्र, ऐन करोनाकाळात सह्याद्रीच्या वाघाने सुमारे ३०० किलोमीटरचे अंतर पार करून  कर्नाटकातील काली व्याघ्रप्रकल्पाचा अधिवास निवडला. याठिकाणी हा वाघ स्थिरावला आहे. २०१८ मध्ये सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील नंदूरबारमध्ये पहिल्यांदा हा वाघ कॅमेरा ट्रॅपमध्ये आला आणि मे २०२० मध्ये कर्नाटकातील दांडेली येथील काली व्याघ्रप्रकल्पात तो  दिसून आला. एप्रिल ते मे २०२० मध्ये कर्नाटकातील वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याची अनेक छायाचित्रे घेतली. गेल्या दोन वर्षात या वाघाने सुमारे १५० चौ. किलोमीटरचे क्षेत्र व्यापले. त्यामुळे मध्य पश्चिम घाटातील वाघांचे कॉरिडॉर अजूनही व्यवहार्य आहेत, याला वाघाच्या स्थलांतरणाने बळकटी मिळाली आहे. काली व्याघ्र प्रकल्प हा उत्तर कर्नाटक, गोवा आणि दक्षिण महाराष्ट्र या लँडस्केपमधील वाघांसाठी महत्त्वाचा ठरत असल्याचे देखील या स्थलांतरणाने सिद्ध केले आहे. २०२० मध्ये या व्याघ्र प्रकल्पात सुमारे २५ प्रौढ वाघांची कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंद झाली होती. त्यामुळे या दोन व्याघ्रप्रकल्पातील हा कॉरिडॉर भविष्यात सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्या दृष्टीनेच आता महाराष्ट्राच्या वनखात्याने सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांसाठी अधिक मजबूत अधिवास तयार करण्याकरिता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tigers travel 300 km from sahyadri to karnataka akp

Next Story
साठवणुकीच्या अयोग्य पद्धतीमुळे राज्यात धान्याची नासाडी सुरूच
ताज्या बातम्या