नागपूर : हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागली आणि पुन्हा एकदा जंगलातील पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची गर्दी वाढायला लागली. पाणवठ्यावर वाघांचे कुटूंब एकत्रितपणे पाहायला मिळणे तसे दुर्मिळच, पण उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव परिसरातील ‘एफ-२’ वाघीण आणि तिच्या बछडे सातत्याने पाणवठ्याजवळ एकत्रीत दिसू लागले आहेत. त्यामुळेच उमरेड-कऱ्हाडला अभयाण्यातील गोठणगाव प्रवेशद्वारातुन जाण्यासाठी पर्यटकांमध्ये गेल्या वर्षभरापासून चांगलीच चढाओढ सुरू आहे आणि त्याला कारणही तसेच आहे.

हे पाचही बछडे मोठे झाले असले तरीही अजूनही आईच्या सोबतच राहात आहेत. अलीकडेच त्यांना पाणवठ्यावरील मस्तीचा एक व्हिडिओ समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल झाला होता. तर आता पुन्हा एकत्रित हे कुटूंब पाणवठ्यावर पाणी पिताना आढळून आले आहे. वन्यजीव छायाचित्रकार विनीत अरोरा यांनी या कुटूंबाचे छायाचित्र त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. त्यात हे बछडे आणि त्यांची आई पाणी पिण्यासाठी आले आहेत.

उमरेड-कऱ्हाडला अभयारण्याची ओळख..

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला खरी ओळख मिळवून दिली ती ‘जय’ या वाघाने. नागझिरा अभयारण्यातून नैसर्गिक स्थलांतर करुन आलेला हा वाघ नंतर कधी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचा झाला ते कळलेच नाही. कधी राष्ट्रीय महामार्गावर, कधी नद्या ओलांडणाऱ्या ‘जय’ ला पाहण्यासाठी सामान्य पर्यटकांपासून तर ‘सेलिब्रिटी’ अशी सर्वांचीच गर्दी असायची. मात्र, ‘जय’ गेला आणि पर्यटकांनी या अभयारण्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर ‘फेअरी’ ही वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांनी पर्यटकांना आकर्षित केले. त्यानंतर पुन्हा पर्यटकांनी पाठ फिरवली. आता ‘एफ-२’ नावाची वाघीणसुद्धा तिच्या पाच बछड्यांसह पर्यटकांना आकर्षित करत आहे. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वाराजवळ ‘एफ-२’ वाघीण आणि तिचे पाच बछडे पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहेत. उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वाराजवळ ते पर्यटकांना भुरळ घालत आहेत.

हे आहे वाघिणीचे कूळ..

एफ-२ वाघीण ही फेअरी वाघिणीची मुलगी आहे. एन-४ आणि पाटील नावाच्या दोन वाघासोबत तिचा वावर होता. सध्या या परिसरात जे-मार्क नावच्या वाघाचा दबदबा आहे. नवंवर्षानिमित्त नागपूरच नाही तर विदर्भातील वनप्रेमी पर्यटकांची पावले नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडलाच्या जंगलाकडे वळली आहेत. या जंगलात वाघाचे हमखास दर्शन पर्यटकांना होत आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या देखील वाढीस लागली आहे. सध्या ही वाघीण आपल्या पाच बछड्यांसह गोठणगाव गेट परिसरात फिरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.