नागपूर : पर्यटकांना ताडोबाच्या जंगलातील वाटा दाखवण्यासाठी जिप्सीतील गाईड मार्गदर्शन करतो आणि मग वाघाच्या मागोवा घेत पर्यटकांच्या जिप्सी जंगलातील अनेक वाटा तुडवतात. मात्र, दरवेळी पर्यटकांना नवीन काहीतरी देणाऱ्या ताडोबात अलीकडेच एक आश्चर्यकारक घटना घडली. वाघ समोर आणि पर्यटक मागे असे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतात. तीन-चार दिवसांपूर्वी मात्र वाघिणीने चक्क पर्यटकांनी भरलेल्या जिप्सींना ताडोबाचा मार्ग दाखवला. बराचवेळ ही वाघीण समोर आणि पर्यटकांच्या जिप्सी मागे असे दृश्य होते.

शेवटी ती वाघीण एका विशिष्ट वळणावर येऊन थांबली आणि त्या वळणावर असलेल्या एका दगडावर लिहिले होते, ‘ताडोबा – दोन किलोमीटर’. पर्यटकांना वाट दाखवणाऱ्या ‘रोमा’ या वाघिणीचा हा व्हिडिओ वन्यजीव छायाचित्रकार रणवीर सिंग गौतम यांनी चित्रित केला आहे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील अनेक वाघ आणि वाघीण त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहेत. अर्थातच ही नावे पर्यटक, गाईड, जिप्सीचालक यांनी दिली आहेत. ‘छोटी तारा’ ही ताडोबाच्या जामनी कुरणातील एक प्रसिद्ध वाघीण होती.

‘येडा अण्णा’ आणि ‘तारा’ या वाघिणीची मुलगी असलेल्या ‘छोटी तारा’ने तिच्या आयुष्यात १५ पेक्षा जास्त वाघांना जन्म देऊन ताडोबातील वाघांच्या वाढीत योगदान दिले. ‘रोमा’ ही चार वर्षांपेक्षा जास्त वयाची वाघीण आहे आणि ती तिच्या आईप्रमाणेच धाडसी आहे. ‘रोमा’ला आता बलराम नावाच्या नर वाघापासून पिल्ले झाली आहेत. हा तिचा दुसरा बछड्यांचा समूह आहे.

‘रोमा’ची बहीण ‘बिजली’ आता जामनी कुरणाच्या आसपास राहते. असे म्हटले जाते की ‘रोमा’ हीच ती वाघीण आहे, जिने प्रसिद्ध ‘माया’ वाघिणीशी पावसाळ्यात भांडण केले आणि तिला गंभीर जखमी केले, तेव्हापासून ‘माया’ बेपत्ता झाली. ज्यांनी फक्त पांढरपावनी, ताडोबा तलाव आणि जामनी कुरण पाहिले आहे, त्यांना या वाघिणीच्या अधिपत्याखालील क्षेत्राची कल्पना येणार नाही.

‘रोमा’ टेकडीचा प्रदेश, पर्यटनासाठी बंद असलेला गाभा क्षेत्रातील वसंतबंधारा ते काटेझारीच्या काही भागापर्यंतच्या परिसरात वावरते. हा परिसर शिकारीसाठी मुबलक प्राणी, गोडे पाणी, थंड हवामान आणि तिचे संरक्षण करणाऱ्या एका मोठ्या शक्तिशाली नर वाघामुळे खूप समृद्ध आहे. ‘रोमा’ खूप धाडसी आहे आणि जेव्हा ती गाभा क्षेत्राच्या पर्यटन भागात येते तेव्हा मुख्य रस्त्यावरून चालते तेव्हा जणू एका राणीच्या मागे अवघी प्रजा जात असल्याचा भास होतो.