लोकसत्ता टीम गोंदिया: गोंदिया शहरापासून काही अंतरावर वाघिणीचे वास्तव्य गेल्या आठ दिवसांपासून आहे. वाघिणी करिता काही मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहे. पण नागरिकांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. वनविभागाच्या पांगडी गावालगत असणाऱ्या गावांना सूचना देण्यात आल्या आहेत. वाघीण नवीन असल्याने वास्तव्यासाठी जागेची पाहणी करीत आहे, असा वनविभागाच्या अभ्यास सांगतो. पण वन विभागद्वारे सध्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून वाघिणीवर वनविभागाचे लक्ष ठेऊन आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत २१ मे रोजी गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी जंगलातून दोन वाघिणी सोडण्यात आल्या होत्या. त्या सोडलेल्या दोन वाघिपीपैंकी एक वाघीण ही प्रकल्पातून भरकटली. गोंदिया शहरा जवळ असलेल्या पांगळी जलाशय व जंगल परिसरात ती असून सुरक्षेच्या दृष्टीने पांगडी येथील जंगल परिसरातील मार्ग पर्यटकांसाठी सध्या बंद करण्यात आले आहेत. तर ठिकठिकाणी वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहे. जीपीएस द्वारे त्या वाघिणी वर वन विभाग नजर ठेवून आहे. आणखी वाचा-भंडारा: आता बाहेरचा पालकमंत्री दिला तर १०० टक्के विरोध; शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार भोंडेकर यांचा सरकारला इशारा गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि वाघिणींची संख्या सम करण्याच्या उद्येशाने ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून पहिल्या टप्यात दोन वाघिणी आणण्यात आल्या. या दोन वाघिणींपैकी एक वाघीण ही नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील परिसरातून बाहेर निघाली असून, तिने आपला मोर्चा गोंदिया शहराजवळ असलेल्या पांगडी जंगलाकडे वळविला आहे. त्यामुळे पांगडी, आसलपणी, धानुटोलाच्या दिशेने येणा-या सर्व मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. व परिसरातील सर्व गावांतील नागरिकांना सुरक्षेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. वाघीण दिसताच वन विभागाला त्याची माहिती देण्याचे आवाहन देखील वनविभागातर्फे करण्यात आले आहे. गोंदिया येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलेल्या दोन्ही वाघिणींना कॉलर आयडी लावण्यात आले आहे. वनविभाग नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने या वाघिणीवर लक्ष ठेवून आहे. पांगडी परिसरात पर्यटक येत असल्याने सध्या पर्यटकांना जंगल परिसरात जाण्यास मनाई करण्यात आले आहे. -राजेंद्र सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक