नागपूर : महाराष्ट्र ते ओडिशा असे कृत्रिम स्थलांतर आणि ओडिशा ते पश्चिम बंगाल व्हाया झारखंड असा नैसर्गिक प्रवास करणारी ‘झीनत’ या वाघिणीला मंगळवारी मध्यरात्रीनंतर ओडिशाच्या सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पात परत आणण्यात आले. बुधवारी सकाळी तिला या व्याघ्रप्रकल्पातील गाभा क्षेत्रातल्या मोकळ्या पिंजऱ्यात सोडण्यात आले. सिमिलीपालमधून बाहेर पडल्यानंतर या वाघिणीनेतब्बल २१ दिवस, तीन राज्ये आणि ३०० किलोमीटरचा प्रवास  केला.

सिमिलीपाल अभयारण्यातील वाघांच्या जनुकीयसंख्येचा पूल मजबूत करण्यासाठी ‘झीनत’ या वाघिणीला नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून आणले होते. त्याआधी ‘यमुना’ या वाघिणीला ताडोबातून सिमिलीपालमध्ये आणण्यात आले. ‘झीनत’ या वाघिणीने आठ डिसेंबरला पहाटे सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पाची सीमा ओलांडली. त्यानंतर ती पश्चिम बंगालमध्ये पोहोचली. २९ डिसेंबरला या वाघिणीला पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील जंगलातून जेरबंद करण्यात आले. त्यानंतर अलीपूर प्राणीसंग्रहालयात तिला नेण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय तपासणीनंतर तिला म्हशीचे मांस खाण्यासाठी देण्यात आले, पण तिने ते नाकारले. दरम्यान, तिचा वैद्यकीय तपासणी अहवाल चांगला आल्यानंतर देखील पश्चिम बंगालच्या वनखात्याने ही वाघीण ओडिशा वनखात्याच्या सुपूर्द केली नाही. त्यामुळे यावरुन वादही निर्माण झाला.

हेही वाचा >>> अमरावती : पाच गुंडांकडून  युवकाची तलवारीने हत्या….सरत्‍या वर्षाच्‍या अखरेच्‍या दिवशी…

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने हस्तक्षेप केल्यानंतर या वाघिणीला मंगळवारी मध्यरात्रीनंतर ओडिशात आणण्यात आले. पश्चिम बंगालच्या मुख्य वन्यजीव रक्षकांना लिहिलेल्या पत्रात प्राधिकरणाने मानक कार्यपद्धतीनुसार या वाघिणीला ओडिशात स्थलांतरित करण्याऐवजी अलीपूर प्राणीसंग्रहालयात का ठेवण्यात आले, असा प्रश्न केला व त्यावर उत्तर मागितले. वाघिणीला परत आणण्यासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करण्यात आला. जामशोला येथील आंतरराज्य सीमेवरुन तिला आणले गेले. यावेळी सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक यांच्या नेतृत्त्वाखाली ओडिशा वनविभागाचे दहा सदस्यीय पथक या वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. या तीन वर्षीय वाघिणीला काही दिवस व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या मोकळ्या पिंजऱ्यात ठेवण्यात येणार आहे. तिच्या हालचालीनंतर आणि वैद्यकीय तपासणीनंतर तिला जंगलात सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> बसस्‍थानकावरच महिलांमध्‍ये हाणामारी…केस धरून ओढत….

रेडिओ कॉलरमध्ये तांत्रिक बिघाड

‘झीनत’ पश्चिम बंगालमध्ये पोहोचली, पण तिला लावण्यात आलेल्या रेडिओ कॉलरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे तिचा मागोवा घेणे ओडिशाच्या वनखात्याला कठीण झाले. त्यामुळे वनविभागाने जंगलाच्या आजूबाजूचे रस्ते बंद करुन २१ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ती बांकुराच्या जंगलात दिसली. यानंतर तिला जेरबंद करण्यात यश आले.

Story img Loader