नागपूर :  शिवसेनेतील बंडावर भाजपप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेसुद्धा मौन बाळगले आहे. बाळासाहेबांनी जसे संघाशी उत्तम संबंध राखले होते तसे उद्धव ठाकरेंनी राखले असते तर सेनेवर आज ही वेळ आली नसती, असा सूर संघाच्या वर्तुळात उमटत आहे. 

भाजपची मातृसंघटना अशी ओळख असलेल्या संघाला विचारणा होत असता ‘नो कॉमेंट’ अशी प्रतिक्रिया मिळाली. जिथे भाजपच बोलायला तयार नाही, तिथे आपल्याकडून मिळेल, अशी अपेक्षा तरी कशी काय करू शकता, अशी मिश्कील प्रतिक्रिया एका पदाधिकाऱ्याने दिली. अर्थात, तेसुद्धा नावाने प्रकाशित करू नका, असे ते म्हणाले. सेना व भाजपचा संबंध जुना आहे व त्याला हिंदुत्वाची किनार आहे. त्यामुळे सेनेत फूट पडल्याचे दु:ख आहेच, पण याला सर्वस्वी जबाबदार उद्धव ठाकरेच आहेत, असे संघाचे अभ्यासक दिलीप देवधर यांनी दिली. गेल्या अडीच वर्षांत सेनेने मोदी, शहांसोबतच देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा लक्ष्य केले होते. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून दूर जाण्याचा प्रयत्न केला. त्याचे परिणाम त्यांना आता भोगावे लागत आहेत. बाळासाहेबांनी जसे संघाशी उत्तम संबंध ठेवले तसे उद्धव यांना जमले नाही, असे ते म्हणाले. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कच्छपी लागून उद्धव ठाकरेंनी निष्ठावंत नेत्यांना नाराज केले. त्यांच्या कारभारावर मंत्री व आमदार नाराज असल्याचे दिसत होते. एक ना एक दिवस हे होईल, याची शंका होतीच, ती खरी ठरली, असे मत तरुण भारतचे माजी संपादक सुधीर पाठक यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. हिंदुत्वापासून फारकत घेण्याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल, याची कल्पना उद्धव ठाकरेंना आली असेल, पण ते सत्तेत मशगूल राहिले, अशी टीकाही त्यांनी केली.