वर्धा : या वाघाने तर आता इतिहास रचला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अभयारण्य व प्रस्तावित व्याघ्र प्रकल्प असलेल्या टिपेश्वर येथील टी – २२ या वाघीणीच्या पोटी जन्मास आलेला हा वाघ. लोकांनी त्याचे नामकरण अव्हेंजर ( Avenger ) असे केले. पुढे तो इतिहास रचणार, हे कोणाच्या ध्यानीमनी नव्हते. २०२३ साली त्याने टिपेश्वर सोडले, अशी माहिती पांढरकवडा उपवनसंरक्षक उत्तम फड हे देतात. पुढे त्याचा मागोवा घेण्यात आला नाही. मग अचानक धाराशिव जिल्ह्यात तो असल्याचे स्पष्ट झाले. या भागात काही शिकार झाल्यात, त्या यानेच केल्या आणि तरणाबांड असा हा वाघ उजेडात आला.
असा झाला प्रवास
या तरुण वाघाने गेल्या वर्षांत जो प्रवास केला आहे तो पाहून वन्यजीवप्रेमी आणि वनविभाग दोन्ही अचंबित झाले आहेत. तब्बल ५०० किलोमीटरहून अधिक अंतर कापून महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांची सफर करत या वाघाने अखेर धाराशिव जिल्ह्यात पाऊल ठेवले. आता बीड जिल्ह्यात त्याच्या पाऊलखुणा उमटल्याचे वृत्त आहे.मध्येच तब्बल १० दिवस कॅमेरा ट्रॅपमधून गायब झालेल्या या वाघाचा सुगावा पुन्हा लागल्याने वनविभागाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
हा वाघ सर्वात आधी डिसेंबर २०२५ मध्ये बीड जिल्ह्यातील आष्टीच्या डोंगररांगांमध्ये दिसला होता. त्यानंतर जुलै २०२६ मध्ये तो पुन्हा याच भागात आढळला. १३ ऑगस्ट रोजी बीडमधील ब्रह्मागाव येथे त्याने एका जनावराची शिकार केली. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाने गस्त वाढवली अन् ठिकठिकाणी ‘कॅमेरा ट्रॅप’ बसवले. २० ऑगस्टला वाघ कॅमेऱ्यात टिपला गेला, मात्र त्यानंतर अचानक त्याचा सुगावा लागेनासा झाला. सलग १० दिवस वनविभागाच्या रडारवरून गायब असलेल्या या वाघाला अखेर २९ ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील ‘येसंवंडी’ परिसरात पुन्हा ट्रॅक करण्यात आले.
५ जिल्ह्यांची भ्रमंती
गेल्या २४ महिन्यांत या वाघाने बीड, लातूर, सोलापूर, अहिल्यानगर आणि आता धाराशिव अशा पाच जिल्ह्यांच्या सीमा ओलांडल्या आहेत. वन अधिकाऱ्यांच्या मते, तरुण नर वाघ स्वतःचे स्वतंत्र साम्राज्य (अधिवास) स्थापन करण्यासाठी, तसेच अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधात असा शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात. या दीर्घ प्रवासात त्याला शिकार आणि पाणी मुबलक प्रमाणात मिळाल्यानेच तो इतका लांबचा टप्पा सुरक्षितपणे पार करू शकला.
वाघ कॉरिडॉर सुरक्षित
या प्रवासाने एक मोठी आशादायी गोष्ट समोर आणली आहे ती म्हणजे टिपेश्वर ते येडशी रामलिंग घाट अभयारण्यादरम्यानचा नैसर्गिक ‘वाघ कॉरिडॉर’ (Wildlife Corridor) अजूनही सुरक्षित आणि कार्यरत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सांगतात की हा वाघ सध्या भूम आणि धाराशिवच्या सीमेवरील तेरखेडा-येसंवंडी पट्ट्यात मुक्तपणे वावरत आहे.नकाशावर आखलेल्या जिल्ह्यांच्या सीमा वन्यजीवांसाठी अस्तित्वात नसतात हेच या वाघाच्या प्रवासाने दाखवून दिले आहे. सध्या वनविभागाचे पथक या वाघाच्या हालचालींवर २४ तास बारकाईने लक्ष ठेवून आहे.
पकडण्याचे प्रयत्न
या वाघास पकडून त्याला सह्याद्री पर्वतरांगात सोडण्याचे प्रयत्न काही काळापूर्वी झाले होते. पण तो हाती लागला नाही. उत्तम फड हे सांगतात की मे २९२३ साली या वाघाने टिपेश्वर सोडले. त्यानंतर त्याचा मागमूस नव्हता. २०२५ साली धाराशिव परिसरात जनावरावर काही हल्ले झाले. वाघ की बिबट अश्या शंका व्यक्त झाल्या. तो कॅमेरात नजरबंद झाल्यावर आम्ही त्यास ओळखले. तो आमचाच वाघ असल्याचे स्पष्ट झाले. सध्या बीड जिल्ह्यात असल्याचे समजते. मात्र तेथील अधिकारीच त्यावर भाष्य करू शकतील. मला सविस्तर सांगता येणार नाही.
