आदिवासी तरुणांना तंत्राद्वारे उद्योगाचा मंत्र

केंद्र सरकार-‘फेसबुक’ यांचा संयुक्त उपक्रम

(संग्रहित छायाचित्र)

केंद्र सरकार-‘फेसबुक’ यांचा संयुक्त उपक्रम

देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर : करोनामुळे बदललेल्या जीवनशैलीत डिजिटल तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची झाली असतानाच ग्रामीण, दुर्गम भागातील आदिवासी समाजालाही तंत्रसाक्षर करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन मोहीम हाती घेतली आहे. केंद्रीय आदिवासी मंत्रालयाने ‘फेसबुक’शी करार करून पाच हजार ग्रामीण आदिवासी तरुणांना तंत्रस्नेही आणि त्या माध्यमातून उद्यमशील बनवण्याची तयारी सुरू केली आहे. स्मार्टफोन आणि वर्षभराची इंटरनेट जोडणी पुरवून या तरुणांना नेतृत्व प्रशिक्षण आणि डिजिटल साक्षरतेचे धडे दिले जाणार आहेत.

केंद्र आणि राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत देशातील प्रत्येक आदिवासी बांधवांचा सर्वागीण विकास साधण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना राबवण्यात येतात. असाच एक महत्त्वाकांक्षी उपक्रम भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालयातर्फे राबवण्यात येत आहे. ‘गोल’ (गोइंग ऑनलाइन अ‍ॅस लीडर) असे या उपक्रमाचे नाव असून या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे आदिवासी समाजातील तरुणांना डिजिटल साक्षर व उद्योजक जगतासाठी पूरक असे ऑनलाइन शिक्षण देण्यात येणार आहे. भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालयआणि फेसबुक यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जाणार आहे.

आदिवासी तरुणांना मार्गदर्शन, नेतृत्व प्रशिक्षण आणि डिजिटल साक्षरता या कौशल्याद्वारे सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. आदिवासी समाजाच्या मूळ परंपरागत व्यवसायांची वृद्धी करण्यासोबतच आदिवासी समाजात आदर्शवत व्यक्तिमत्त्व तयार करणे हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश आहे. ‘गोल’ नावाच्या या योजनेच्या माध्यमातून युवकांना माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास उपक्रमांतर्गत जागरूकता, डिजिटल साक्षरता आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.

२५०० विषयतज्ज्ञ नियुक्त

१८ ते ३५ वर्षांमधील अनुसूचित जमाती प्रवर्गातील युवक यासाठी आवेदन करू शकणार आहेत. उपक्रमाअंतर्गत एक स्मार्ट फोन आणि एका वर्षांचे इंटरनेट दिले जाणार आहे. सात महिन्यांचा हा कार्यक्रम आहे. त्यानंतर युवकांना २ महिन्यांची आंतरवासिता करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, औद्योगिक भेट आणि अन्य गोष्टींचा लाभ दिला जाणार आहे. देशभरातून २५०० विषयतज्ज्ञ नियुक्त केले गेले आहेत. विदर्भातील आदिवासीबहुल भागातील अनेक युवकांना याचा लाभ घेता येणार आहे. नागपुरातील मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालयाची विदर्भाचे ‘सेंटर ऑफ एक्सिलेंस’ म्हणून निवड केली आहे. डॉ. केशव वाळके याचे नेतृत्व करणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tips of business to tribal youth through technology zws