To make good person Dr Proposition Mohan Bhagwat ysh 95 | Loksatta

चांगली व्यक्ती घडवणे म्हणजे हिटलर नव्हे, महर्षींना जन्म देणे होय!; डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

समाजात चांगली व्यक्ती घडवणे म्हणजे हिटलर किंवा रावणाला जन्म देणे नव्हे, तर सप्तर्षी, महर्षींना जन्म देणे होय.

चांगली व्यक्ती घडवणे म्हणजे हिटलर नव्हे, महर्षींना जन्म देणे होय!; डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन
डॉ. मोहन भागवत (संग्रहित छायाचित्र)

नागपूर : समाजात चांगली व्यक्ती घडवणे म्हणजे हिटलर किंवा रावणाला जन्म देणे नव्हे, तर सप्तर्षी, महर्षींना जन्म देणे होय. धर्माचे हेच तत्त्व आपल्या ऋषी-मुनींना अनेक वर्षांच्या तपानंतर सापडले होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. वैदर्भीय हरिकीर्तन संस्था आणि दुर्गादेवी सार्वजनिक देवस्थान, राणाप्रतापनगर यांच्या संयुक्त विद्यमाने हभप बाबासाहेब साल्पेकर जन्मशताब्दी व हरिकीर्तन संस्थेच्या ३९ वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित सप्तदिनात्मक कीर्तन सत्राचे भागवत यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

भागवत म्हणाले, व्यक्ती, समूह, सृष्टी या सगळ्यांनी नीट चालावे. एकाचवेळी सगळ्यांचा विकास व्हावा. समाजाचा विकास आणि पर्यावरणाचा नाश होऊ नये. समाजाच्या विकासाकरिता व्यक्तीची गळचेपी होऊ नये. चांगल्या व्यक्तीला घडवणे म्हणजे रावणाला, हिटलरला जन्म देणे नव्हे तर त्यातून सप्तर्षीला जन्म देणे होय. अशाच प्रकारचे सम्यक समतोल साधणारे धर्मतत्त्व आपल्या ऋषी-मुनींना सापडले.

आज आपण ज्यांना भटके आणि विमुक्त म्हणतो त्यांना इंग्रजांनी गुन्हेगार म्हटले होते. ते का भटके झाले? त्यांना परिस्थितीने भटके केले नाही तर ते एकेका कलेचे व्रत घेऊन समाजाला शिक्षित करण्यासाठी कुठे घर न बांधता, एका ठिकाणी न राहता कुटुंबासह संचार करीत होते. देशाच्या पारतंत्र्यामध्ये ते सतत स्वातंत्र्याचा जागर करत लढत राहिले. अशाप्रकारे कोट्यवधी लोक हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सगळीकडे भ्रमण करीत होते. कीर्तन संस्था या देखील त्यापैकीच एक आहे, असेही डॉ. भागवत म्हणाले.

भारत हे अमर राष्ट्र

अनेक राष्ट्रांचा आता मागमूसही नाही, इतिहास फक्त आहे. काही हजार वर्षांनी ते सुद्धा लुप्त होतील. पण, आमच्या राष्ट्राचे प्रयोजनच असे आहे, की ते अमर आहे. सर्वांना एकमेकांशी जोडणारे धर्मतत्त्व आमच्या येथे आहे, असेही डॉ. मोहन भागवत यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विधानाचा संदर्भ देत स्पष्ट केले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-07-2022 at 10:22 IST
Next Story
हिजाब घालून आल्याने परीक्षा केंद्रावर वादावादी, प्रवेश नाकारल्याचा विद्यार्थिनींचा आरोप