अंबाझरी तलावात होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येकडे प्रशासनाने गांभीर्याने बघत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच आज रविवारी दुपारी एक वाजता दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. परंतु, हा मृत्यू आकस्मिक नसून ढिम्म प्रशासनाने घेतलेले बळी असल्याची चर्चा होत आहे. मिहिर शरद उके (१९, इंदोरा) आणि चंद्रशेखर किशोर वाघमारे (२०, लष्करीबाग) अशी तलावात बुडून मृृत्यू पावलेल्या तरुणांची नावे आहेत.

अंबाझरी तलाव हा मृत्यूचा सापळा ठरत असल्याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. पाण्यात अन्य शिकाऊ मुले पोहताना बघून अनेकांंना पोहण्याचा मोह आवरता येत नाही. त्यामुळे तलावात पोहणे येत नसतानाही फिरायला येणारे आकर्षणापोटी पाण्यात उड्या घेतात. तेथेच त्यांचा घात होतो. आज रविवारी दुपारी बारा वाजता मिहीर उके, चंद्रशेखर वाघमारे, अक्षय मेश्राम आणि बंटी हे चौघेही अंबाझरी तलावावर फिरायला आले होते. चौघेही वर्गमित्र असून रविवारची सुटी अंबाझरीवर घालवण्याच्या तयारीत आले होते. मिहिर उके याने पाण्यात पोहण्यासाठी अन्य तिघांना प्रोत्साहन दिले. मिहिरने सर्वप्रथम पाण्यात उडी घेतली. काही वेळात तिघेही मित्र पाण्यात उतरले. परंतु, मिहिर खोल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला. त्याने चंद्रशेखरला ‘वाचवा…वाचवा…’ असा आवाज दिला. त्याने मित्राला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. दोघांनाही पोहणे येत नसल्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला. एकाने अंबाझरी पोलिसांना आणि अग्निशमन विभागाला माहिती दिली. तासाभराच्या मेहनतीनंतर दोनही तरुणाचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

गर्दीने घेतली बघ्यांची भूमिका
मिहिर आणि चंद्रशेखर हे दोघेही बुडायला लागल्यामुळे काठावर असलेल्या अक्षय आणि बंटीने गर्दीकडे बघून ‘वाचवा…वाचवा…’ अशी साद घातली. रविवार असल्यामुळे तलावाच्या काठावर जवळपास असलेल्या ३० ते ४० जणांपैकी एकानेही मदतीसाठी धाव घेतली नाही. सगळ्यांनी बघ्यांची भूमिका घेतल्याने दोन तरुणांचा बळी गेला.