भंडारा : तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ६५२ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. एकूण एक लाख वीस हजार पस्तीस रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. येणाऱ्या पिढीला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थापासून दूर राहावे यासाठी शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी पोलीस विभाग, शिक्षण विभाग, सलाम फांऊडेशन, आरोग्य प्रबोधिनी संस्थेद्वारे जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येतो. काल जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबवण्यात आलेल्या बाबींचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर हे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यात एकूण १३२९ शाळांमध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. १९३ शाळा तंबाखूमुक्त झाल्या असून या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी व्यसनापासून दूर राहत आहेत. जिल्ह्यातील अन्य शाळा-महाविद्यालयांमध्ये पोलीस व शिक्षण विभागांनी अचानक भेटी देऊन या अभियानाच्या यशस्वीतेकरिता प्रयत्न करावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.