चंद्रपूर: शहरातील प्रेमाचे प्रतीक असलेल्या गोंडराजे बिरशहा-राणी हिराई यांच्या समाधीवर इको-प्रो संस्था आणि एफईएस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करून इतिहासाला उजाळा दिला. ‘सलाम राणी हिराई’ कार्यक्रमांतर्गत शेकडो विद्यार्थ्यांनी राणी हिराई यांच्या अजरामर प्रेमाचे आणि कर्तृत्वाचे स्मरण केले.

आजच्या तरुणाईला प्रेमदिनाच्या निमित्ताने क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता, नात्यांमधील प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्या समाधीस्थळावर हा कार्यक्रम आयोजित केला जातो.

राणी हिराईने पतीच्या मृत्यूनंतर या समाधी-वास्तूचे बांधकाम केले. ताजमहलच्या तोडीची सुंदर आणि आकर्षक वास्तू बांधून त्यांनी पतीवरील आपले प्रेम व्यक्त केले. ताजमहल प्रमाणेच राणी हिराई ने सुद्धा एका दगडात आधी या वास्तूची प्रतिकृती तयार करवून घेतली होती, ही प्रतिकृती आजही मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर येथे सुरक्षित आहे. त्यानंतर त्यांनी राज्याचा कारभार यशस्वीपणे सांभाळत अनेक विकासकामे केली. राणी हिराईचा हा आदर्श आजच्या तरुणाईने घेण्याची गरज आहे.

“चंद्रपूर शहरात असलेली ही प्राचीन वास्तू आपला ऐतिहासिक वारसा आहे. राणी हिराईने आपल्या कार्यांमधून गोंडराजे बिरशहा आणि राणी हिराई यांच्यातील प्रेम अजरामर केले,” असे मत प्राध्यापकांनी व्यक्त केले.

“राणी हिराई आणि राजा बिरशहा यांचे प्रेम अमर आहे. त्यांच्या कार्यांमधून ते सतत जिवंत राहणार आहेत. आजच्या तरुणाईने अशा स्थळांना भेट देऊन आदर्श घेण्याची गरज आहे, क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता, युवा पिढीने भारतीय संस्कृती मध्ये विविध नात्यातील प्रेम व्यक्त करण्यास विशिष्ट दिवसाची गरज नसून ते आपल्या कार्यातून व कृतीतून व्यक्त केले पाहिजे असा संदेश अनेक घटकांतुन सांगितले आहे.” असे मत इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र बारसागडे यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. मेघमाला मेश्राम यांनी मानले. सलाम राणी हिराई कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडू धोतरे होते तर यावेळी मार्गदर्शन करणारे प्रभारी प्राचार्य डॉ राजेश चिमनकर, प्रा. डाॅ करुणा करकाडे, प्रा. सावधान उमक यांनी केले. यावेळी विविध प्राध्यापक, इको-प्रो सदस्य आणि शेकडो विद्यार्थी उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राजू काहिलकर, सुनील पाटील, सचिन धोतरे, सनी दुर्गे, चित्राक्ष धोतरे यांनी सहकार्य केले.

Story img Loader