नागपूर : कार्यालयातून घरी परतण्याची वेळ आणि त्याचवेळी अचानक आलेला मुसळधार पाऊस यामुळे उपराजधानीतील चाकरमान्यांची सोमवारी चांगलीच फजिती झाली. दुपारी साडेचारनंतर सुमारे तास-दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आडोसा शोधायलाही संधी मिळाली नाही. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून दडी मारलेल्या या पावसाने वातावरणातील उकाडा बराच कमी के ला. नागपूर आणि वर्धा वगळता विदर्भात इतरत्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.

मोसमी पाऊस विदर्भात अजूनही म्हणावा तसा कोसळला नाही. रिमझिम पाऊस, कधीतरी एखाद्या भागात १०-१५ मिनिटे कोसळलेला पाऊस याव्यतिरिक्त मोसमी पावसाने त्याच्या आगमनाची नांदी दिलीच नाही. उपराजधानीत पूर्वमोसमी पाऊस मात्र मोठमोठी वृक्ष कोसळेपर्यंत झाला. मोसमी पावसाच्या लपंडावामुळे वातावरणात प्रचंड उकाडा होता. सोमवारी दुपापर्यंत चांगलेच ऊन होते, पण चार वाजेनंतर आकाशात ढगांची गर्दी झाली. करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरात सोमवारपासून दुपारी चापर्यंत दुकाने आणि इतर प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यास परवानगी होती. नव र्निबधांचा पहिला दिवस असल्याने दुकानदार प्रतिष्ठाने बंद करण्याच्या तयारीत असतानाच पावसाने प्रवेश के ला.

काही वेळातच विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस धो-धो कोसळला. त्यामुळे दुकानातून बाहेर पडणारे ग्राहक आणि दुकानदार यांची चांगलीच तारांबळ उडाली. तर रस्त्यावर लहान-मोठी दुकाने लावून उपजीविका करणाऱ्या वर्गालाही पावसाचा फटका बसला. कार्यालय सुटण्याची नेमकी हीच वेळ होती. त्यामुळे चाकरमानेही पावसात अडकले. त्यांना आडोसा शोधायलाही वेळ मिळाला नाही. तब्बल तास-दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. शहरात सिमेंट रस्त्यांची कामे सुरू असताना मुसळधार पावसामुळेही वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. वाहनचालकांना धुव्वाधार पावसामुळे समोरचे काहीही दिसत नव्हते. मात्र, त्याचवेळी या पावसाने उकाडय़ापासून सुटका दिल्याचे समाधानही होते.

गडगडाटासह पावसाची शक्यता

नागपूर आणि वर्धा वगळता चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्य़ात पाऊस किं वा पाऊससदृश स्थिती नव्हती. तर अमरावती जिल्ह्य़ात पाऊस विखुरलेल्या स्वरूपात होता. चांदूरबाजार, तिवसा या तालुक्यांमध्ये सकाळी पाऊस, तर अमरावती येथे १५ मिनिटे हलक्या सरी कोसळल्या. अकोला, बुलढाणा, वाशीम जिल्ह्य़ात ढगाळ वातावरण होते, पण पाऊस झाला नाही. दरम्यान, हवामान खात्याने विदर्भातील या जिल्ह्य़ांमध्ये काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.