scorecardresearch

मरणानंतरही यातनादायी अंत्यप्रवास!; चंद्रपुरात पुराच्या पाण्यातून निघाली अंत्ययात्रा

”इतकेच मला जातांना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते”, ही कविवर्य सुरेश भट यांची लोकप्रिय कविता.

मरणानंतरही यातनादायी अंत्यप्रवास!; चंद्रपुरात पुराच्या पाण्यातून निघाली अंत्ययात्रा
मरणानंतरही यातनादायी अंत्यप्रवास!; चंद्रपुरात पुराच्या पाण्यातून निघाली अंत्ययात्रा

माजी मंत्री वडेट्टीवार यांच्या जन्मगावातील घटना

चंद्रपूर : ”इतकेच मला जातांना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते”, ही कविवर्य सुरेश भट यांची लोकप्रिय कविता. जिवंतपणी भोगलेल्या यातनांतून मृत्यूमुळे सुटका झाल्याचा या ओळींचा अर्थ. मात्र, याविपरीत अनुभव चंद्रपूर जिल्ह्यात आला. माजी मंत्री, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या जन्मगावातील एका तरुणाचा मरणानंतरचा अंत्यप्रवासही यातनादायी ठरला.

सर्वाधिक प्रेमविवाह करणारे गाव म्हणून करंजी गाव प्रसिद्ध आहे. आ. वडेट्टीवार यांच्या करंजी या जन्मगावातून काँग्रेसने ‘तिरंगा गौरवयात्रा‘ काढली. मात्र, याच गावाला पुराचा फटका बसल्याने एका तरुणाची अंत्ययात्रा पुराच्या पाण्यातून काढावी लागली. पुराच्या पाण्यातून निघालेल्या या अंत्ययात्रेची राज्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे.

एकीकडे, काँग्रेसची ‘तिरंगा गौरवयात्रा‘ मोठ्या उत्साहात निघाली. यात्रेत करंजीचे भूमिपुत्र माजी मंत्री विजय वडेटटीवार, आ. सुभाष धोटे, आ. प्रतीभा धानोरकर, ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे सहभागी झाले होते. चिंब पावसात नेते आणि कार्यकर्ते मंडळी ढोल-ताशांच्या तालावर नाचतगाजत निघाले. आक्सापूर-पोंभुर्णा असा त्यांचा प्रवास सुरू होता. दुसरीकडे, त्याचवेळी करंजीतील रवी आत्राम (३०) या तरुणाचा मृत्यू झाला. आत्राम कुटुंबीयांना त्याच्यावर अंत्यसंस्कार करताना अक्षरशः देव आठवले. साधारणतः चार फूट पाण्यातून मार्गक्रमण करीत, प्रचंड यातना सहन करीत तरुणावर अंत्यसंस्कार पार पडले.

गोंडपिपरी तालुक्यातील करंजी हे सर्वात मोठे आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचे गाव. या क्षेत्रातील आमदार काँग्रेसचाच, पण गावात मुलभूत समस्यांची वानवा. गावातील समस्या सुटत नसतील तर लोकप्रतिनीधी काय कामाचे, असा संतप्त सवाल येथील प्रत्येकाच्या तोंडी. या गावाकडे लोकप्रतिनिधींनी नेहमीच दुर्लक्ष केले. स्मशानभूमीच्या मार्गाचा प्रश्न ग्रामस्थांनी आ. धोटेंकडे वारंवार लाऊन धरला. पण, त्याचा काहीच फायदा झाला नाही. गेल्या महिनाभरापासून पावसाने सर्वत्र हाहाकार माजविलाय. चहुकडे पाणीच-पाणी असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. अशावेळी कुटुंबातील कर्ता तरुण गेल्याचे दुःख असतानाही त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीयांना स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागला. शिवाय, मृत तरुणाला मरणानंतरही यातनादायी अंत्यप्रवास घडला. आतातरी हा प्रश्र्न सुटणार का?, करंजीचा विकास होणार का? असे प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या