लोकसत्ता टीम अमरावती : चिखलदरा येथील भीमकुंड धबधबा या प्रेक्षणीय स्थळी माकडांनी उच्छाद मांडल्याने वनविभागाने १ आणि २ जुलै रोजी या धबधबा परिसरात पर्यटकांना प्रवेशबंदी केली होती. वनविभागाने या उपद्रवी माकडांना पिंजऱ्यात बंदिस्त करून बुधवारी सकाळी जंगलात सोडून दिले. भीमकुंड परिसरात माकडांनी पर्यटकांवर हल्ला करण्याच्या घटना उघडकीस आल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. या माकडांचा वेळीच बंदोबस्त करणे आवश्यक असल्याने पर्यटकांची काळजी आणि सुरक्षा लक्षा घेऊन मेळघाट वन्यजीव विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यांनी सोमवारी आणि मंगळवारी भीमकुंड धबधबा येथील प्रवेश पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दोन दिवस कुणीही भीमकुंड परिसरात जाऊ नये, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले होते. आणखी वाचा-भेंडी, शेंगा, वांगे खाऊन कंटाळा आलाय? मग चला रानभाजी खायला; ‘ही’ गावे पंचक्रोशीत आहेत प्रसिद्ध… या दोन दिवसांमध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भीमकुंड परिसरात पिंजरे लावून माकडांना बंदिस्त केले. या माकडांना जंगलातील निर्मनुष्य ठिकाणी सोडण्यात आले. सातपुडा पर्वतरांगांमध्ये सध्या पाऊस सुरू असल्याने मेळघाटातील धबधबे वाहू लागले आहेत. चिखलदरा येथील भीमकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत. त्यातच माकडांचा उपद्रव वाढल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. भीमकुंड परिसरात लाल तोंडाच्या माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. ही माकडे कळपात राहतात. एका कळपात ३० ते ४० माकडे असतात. त्यात ७-८ नर, १० ते १५ माद्या आणि बाकी लहान पिल्ले असतात. ही माकडे वनात लाजाळू असतात आणि शहरात आल्यावर आक्रमक होतात. पर्यटन स्थळावर माणसांच्या हातातल्या वस्तू हिसकावण्यासाठी त्यांच्यात चढाओढ असते. आणखी वाचा-जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्तदिन विशेष : ‘प्लास्टिक पिशवीची सवय सोडा, जीवनाशी नाते जोडा’; डॉक्टर दाम्पत्याची विशेष मोहीम शहरात येणे माकडांसाठी सुरक्षित असते. कारण तिथे खायला मिळते. माणसांच्या हातून काही पदार्थ हिसकावले तर त्याला विरोध होत नाही. त्यामुळे एखाद्या जंगलात माकडांची संख्या जास्त असेल आणि त्या जंगलात त्यांना खायला मिळाले नाही तर त्या जंगलालगतच्या शहरात किंवा पर्यटन स्थळी माकडांची संख्या खचितच जास्त असते. पण, मेळघाटात सध्या आढळून आलेल्या लाल तोंडांच्या माकडांचा मेळघाट हा मूळ अधिवास नाही, तर ते राज्यातील इतर भागातून या ठिकाणी आले आहेत. मेळघाटातील जंगलात काळ्या तोंडाची माकडे आढळून येतात, असे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे. भीमकुंड येथील धबधबा परिसरातील माकडांची जंगलात रवानगी झाली असली, तरी पुन्हा त्यांचा उपद्रव वाढू नये, याची खबरदारी पर्यटकांनीही घ्यावी, या माकडांना खाण्यास दिल्यास, ते त्याच ठिकाणी थांबून हातातील वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न करतात, अनेकवेळा आक्रमक होऊन मनुष्यावर हल्ला देखील करतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.