नागपूर : खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे माटे चौक ते आयटी पार्क चौकापर्यंतच्या रस्त्यावर होणाऱ्या वाहन कोंडीची समस्या पुन्हा गंभीर झाली आहे. कारवाईचा देखावा करून परतणाऱ्या महापालिकेच्या पथकाने आता या विक्रेत्यांकडून दीडपट हप्ता वसुली सुरू केल्याची माहिती आहे. वाहतूक पोलिसांचेही या समस्येकडे दुर्लक्ष झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माटे चौक ते आयटी पार्क परिसरात पदपथावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. तेथे येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांमुळे येथे रोज वाहतूक कोंडी होत आहे.  या समस्येकडे लक्ष वेधणारी वृत्तमालिका ‘लोकसत्ता’ने  प्रकाशित केली होती. यानंतर महापालिका आणि  वाहतूक पोलिसांनी  संयुक्त कारवाई करीत येथील अतिक्रमण हटवले.  काही दिवस या मार्गावरची समस्या दूर झाली होती. यामुळे परिसरातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला होता. परंतु, नंतर  उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित करत व  वाहतुकीला अडथळे येऊ न देता व्यवसाय करण्याचे आश्वासन देऊन  विक्रेत्यांनी पुन्हा दुकाने सुरू केली. पण, चित्र काही बदलले नाही. आता पहिल्यापेक्षा अधिक खाद्यपदार्थ विक्रेते येथे व्यवसाय करतात. रात्री आठ वाजतानंतर तर या रस्त्यावरून जाणेही अवघड होते. रस्त्यावर उभ्या वाहनांमुळे अपघात घडतात. हा वर्दळीचा रस्ता आहे.  जड वाहनेही या मार्गावरून धावतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने लागतात. ग्राहकांच्या वाहनांने अर्धाअधिक रस्ता व्यापला जातो. अनेक ग्राहक उलटया दिशेने भरधाव वाहन दामटतात. त्यामुळे अनेकांना इजा झाली आहे.

वाहतूक पोलीस बघ्यांच्या भूमिकेत

महापालिकेप्रमाणेच वाहतूक पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. विशेष म्हणजे, अनेक विक्रेत्यांनी त्यांच्या वाहनात नियमबाह्यपणे बदल केले आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी  दंडात्मक कारवाई करून आरटीओमध्ये नोंदणी रद्दसाठी प्रस्ताव पाठवणे गरजेचे आहे.  

पुन्हा कारवाई करू

यापूर्वी माटे चौक ते आयटी पार्क  दरम्यान व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. पण, तरीही हे विक्रेते जुमानत नसतील तर लवकरच पुन्हा  कारवाई केली जाईल.

– अशोक पाटील, अतिक्रमण विभाग, महापालिका.

वाहनांमध्ये अवैधरित्या बदल करणाऱ्या वाहनांना जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. आम्ही महापालिकेलासुद्धा पत्र देऊन संयुक्त मोहीम राबवण्याची विनंती केली आहे.

– रवींद्र पवार, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam again on vnit road due to food vendors zws
First published on: 17-08-2022 at 15:02 IST