मध्य भारतात रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे काम सुरू असून त्यासाठी वारंवार देशभरातील शेकडो रेल्वेगाड्या रद्द करण्यात येत आहेत. मात्र, रद्द झालेल्या गाड्यांमधील प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्याची तसदी रेल्वेकडून घेतली जात नाही. त्यामुळे प्रवासी कुटुंबियांसोबत ठिकठिकाणी अडकून पडत असून त्यांचा पैसा आणि वेळेचा मोठा अपव्यय होत आहे.अलिकडे नागपूर ते बिलासपूर ‘नॉन-इंटरलॉकिंग‘चे काम करण्यासाठी तब्बल आठ ते दहा दिवस ५८ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये काही लांब पल्ल्याच्या गाड्या होत्या. तसेच साप्ताहिक आणि विशेष गाड्यांचाही समावेश होता. रेल्वेने प्रवाशांना १२० दिवस आधी रेल्वे तिकीट आरक्षित करण्याची सुविधा दिली आहे. कुटुंबासह प्रवास करताना त्रास होऊ नये आणि सुरक्षित प्रवास व्हावा म्हणून लोक आगाऊ आरक्षण करून ठेवतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, रेल्वेकडून अचानक रेल्वेगाडी रद्द केली जाते. त्यामुळे प्रवाशांचे सर्व नियोजन कोलमडते. त्यातल्या त्यात रेल्वे कोणतेही सहकार्य करीत नाही. उलट रेल्वेगाडी रद्द झाल्यानंतर २४ तासानंतर भाड्याची रक्कम परत केली जाते. ते देखील सेवा शुल्क कापून. रद्द झालेल्या गाड्यांमधील प्रवाशांना वाऱ्यावर सोडले जाते. त्यांची इतर रेल्वेगाड्यांमध्ये व्यवस्था केली जात नाही. एवढेच नव्हे तर अशा प्रवाशांना रेल्वे स्थानकावरील विश्रांती कक्षाची (रिटायरिंग रुम) सेवामुदत वाढवून दिली जात नाही. यासंदर्भात भारतीय यात्री संघाचे बसंतकुमार शुक्ला म्हणाले, रेल्वे सुविधांची यंत्रणा कोलमडली आहे. प्रवासी तीन-चार महिन्यांपासून तिकीट खरेदी करतो. यात प्रवाशांचा काय दोष आहे. प्रशासन ऐनवेळी रेल्वेगाड्या रद्द करते. पण, त्यांची पर्यायी व्यवस्था करीत नाही.

हेही वाचा : भंडारा : गौण खनिज तस्करांवर कारवाईचा धडाका ; १ कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

माझे मित्र छत्तीसगड एक्सप्रेसने अंबाला (हरियाणा) २८ ऑगस्ट २०२२ ला गेले होते. त्यांचे परतीचे तिकीट छत्तीसगड एक्सप्रेसचे ३० ऑगस्टला २०२२ चे होते. त्याच दिवशी सकाळी साडेनऊ वाजता गाडी रद्द झाल्याचा संदेश पाठवण्यात आला. ही गाडी रात्री पावणे दहाची होती. रात्री परत जायचे असल्याने अंबाला रेल्वे स्थानकावरील ‘रिटायरिंग रूम’ २४ तासासाठी ‘बुक’ केले होते. म्हणजे रात्री ८ वाजेपर्यंत ‘बुकिंग’ होते. गाडी रद्द झाली आणि नागपूरसाठी अन्य साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे ‘रिटायरिंग रूम’ची सेवा मुदतवाढ करण्याची विनंती करण्यात आली. पण, ती मान्य करण्यात आली नाही. शेवटी त्यांना आपल्या कुटुंबाला घेऊन हॉटेलमध्ये राहावे लागले. यावर आम्ही काहीच करू शकत नाही. ‘रिटायरिंग रूम’ रेल्वे चालवत नाही तर खासगी कंपनी चालवते, असे रेल्वे कर्मचारी उत्तर देत होते. रेल्वेत अलिकडे प्रवाशांचा वाली कोणी उरला नाही, असेही शुक्ला म्हणाले.

” रेल्वेगाडी रद्द झाल्यानंतर प्रवासाचे भाडे परत केले जाते. प्रवाशांची व्यवस्था रेल्वे करीत नाही. तिकीट आणि विश्रांती कक्षाचा काहीही संबंध नाही. इतर कोणीही येथे येऊन राहू नये म्हणून ‘पीएनआर’ क्रमांकाशिवाय त्याचे ‘बुकिंग’ करता येत नाही.” -रविशकुमार सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे, नागपूर</p>

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Train was cancelled problem for passengers rest room central railway nagpur tmb 01
First published on: 10-10-2022 at 13:43 IST