नागपूर : आमदार रवी राणा यांच्या दबावाखाली नगररचना विभागाने एका प्रशासकीय अधिकाऱ्याची बदली केली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात संंबंधित अधिकाऱ्याने याचिका केल्यावर नगर रचनाकार विभागाने उत्तर न सादर न केल्यामुळे न्यायालयाने नगर विकास विभागावर दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्या. नितीन सांबरे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगर रचनाकार विरेंद्र डाफे हे अमरावती येथे कार्यरत होते. त्यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला नसल्यामुळे ते नियमानुसार बदलीस पात्र नव्हते. यानंतरही त्यांची बदली नगर रचनाकार (मुल्यांकन तज्ञ), अकोला या पदावर करण्यात आली. डाफे यांच्या जागेवर लातूर येथे कार्यरत असलेले नगर रचनाकार संजय नाकोड यांची बदली करण्यात आली. नाकोड यांना देखील लातूर येथे ३ वर्षे पूर्ण झाले नसल्यामुळे ते देखील बदलीस पात्र नव्हते. डाफे आणि नाकोड यांची बदली बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांच्या पत्रावर करण्यात आली. त्यामुळे डाफे यांनी या बदली आदेशाला महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात (मॅट) आव्हान दिले. मॅटने डाफे यांची याचिका फेटाळली. दरम्यान, यापूर्वी उच्च न्यायालयाने एका प्रकरणात राजकीय नेत्यांच्या पत्रावर बदली करण्यात येणार नाही, असा आदेश दिला होता. राज्य शासनाचे मुख्य सचिव यांनी राजकीय नेत्यांच्या पत्रावर बदली करता येणार नाही, असे शपथपत्र देखील उच्च न्यायालयात दाखल केले होते. उच्च न्यायालयाच्या या आदेशाच्या आधारावर डाफे यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी करताना न्या. नितीन सांबरे आणि न्या. अभय मंत्री यांनी नगर विकास विभागाला १४ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे तसेच संपूर्ण रेकॉर्ड न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश दिले होते. यानंतरही विभागाने उत्तर सादर केले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने विभागाला दोन आठवड्यांचा कालावधी देत विभागावर दहा हजारांचा दंड ठोठावला. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. मिलींद राठी, अ‍ॅड. अविनाश कापगते तर शासनाच्यावतीने अ‍ॅड. नितीन राव यांनी बाजू मांडली.

हेही वाचा – नागपूर : भरधाव कारने पदपथावर झोपलेल्या ९ जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू, ७ जण गंभीर

हेही वाचा – वर्धा : इराणी टोळीच्या सदस्याला अटक; वयोवृद्ध व्यक्तींनाच हेरायचे अन्…

कोण आहेत रवी राणा?

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा हे सध्या भाजपाचे समर्थक आहेत. २००९ ते २०१४ पर्यंत ते आघाडी सरकाच्या बाजूने होते. मात्र २०१४ मध्ये सत्ता बदल होताच ते भाजपाकडे वळले. माजी खासदार नवनीत राणा यांचे ते पती आहेत. २००९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते. हनुमान चालीसाच्या मुद्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transfer of officer under pressure of mla ravi rana the high court imposed a fine on the town planning department tpd 96 ssb
Show comments