विदर्भातील पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त दर्जाच्या जवळपास ८० टक्के पोलीस अधिकाऱ्यांचा दोन वर्षांचा सेवाकार्यकाल पूर्ण झाला आहे. त्यामुळे बहुतेक पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पद मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये नागपुरातील पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर पोलीस दलात १० पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. सध्या दहापैकी तीन पोलीस उपायुक्तांची अन्य जिल्ह्यात बदली झाली आहे. त्यामुळे दोन परिमंडळाचा आणि एका शाखेचा अतिरिक्त पदभार अन्य उपायुक्तांकडे आहे. शहरातील सहापैकी पाच पोलीस उपायुक्तांचा नागपुरातील दोन वर्षांचा सेवा कार्यकाळ जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामध्ये नुरूल हसन, गजानन राजमाने, सारंग आवाड, चिन्मय पंडित, डॉ. संदीप पखाले यांचा समावेश आहे. नागपूर पोलीस दलातून पोलीस उपायुक्त मनिष कलवानीया यांची औरंगाबाद ग्रामीण येथे तर लोहित मतानी यांची भंडारा येथे अधीक्षक पदावर तर अक्षय शिंदे यांची उस्मानाबाद येथे अधीक्षकपदावर बदली झाली आहे.

हेही वाचा : नागपूर मेट्रो प्रकल्पास गती मिळणार ; ५९९ कोटींच्या वाढीव खर्चास मंजुरी

नागपुरातील पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांची वर्धा जिल्हा किंवा नागपूर ग्रामीण येथे पोलीस अधीक्षकपदासाठी वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. नुरूल हसन यांनी दोन्ही जिल्ह्याच्या अधीक्षक पदासाठी जोरदार ‘तयारी’ केल्याची चर्चा आहे. यापूर्वी ते यवतमाळ येथे कार्यरत असताना त्यांनी गुलाम नबी आझाद यांना पंतप्रधान पदासारख्या अतिमहत्वाच्या व्यक्तींना लागणारी सुरक्षाव्यवस्था पुरविली होती. त्यामुळे यवतमाळातील भाजप नेते तसेच भाजप आमदार मदन येरावार यांनी लेखी स्वरुपात आपली नाराजी व्यक्त केली होती, यामुळे ते चर्चेत आले होते, हे विशेष. नुरूल हसन यांची नागपूर ग्रामीण किंवा वर्धा येथे पोलीस अधीक्षक पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

हेही वाचा : Dasara 2022: विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालकांकडून मातृशक्तीचा गौरव, मातृभाषा जतन करण्याचे आवाहन

नागपुरातील सर्वात जेष्ठ असलेले आयपीएस अधिकारी सारंग आवाड हे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, त्यांची नियुक्ती यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकपदावर होण्याची चर्चा आहे. गुन्हे शाखेचे यशस्वी पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिल्ली येथे प्रतिनियुक्तीवर जाण्याची तयारी केली होती. मात्र, त्यांच्या नावाची चर्चा अकोला जिल्हा अधीक्षक पदासाठी होत आहे. नागपुरात सर्वाधिक काळ घालविणारे आणि ‘मिस्टर क्लिन’ अशी प्रतिमा असणारे गजानन राजमाने यांची पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात जाण्याची तयारी आहे. मात्र, पुणे आयुक्तालयात त्यांची उपायुक्त म्हणून नियुक्ती होणार असल्याची सध्या चर्चा आहे. परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉ. संदीप पखाले यांच्याही नावाची चर्चा असून ते नाशिकमध्ये उपायुक्त पदावर जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियुक्ती झालेले नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या बदलीचीही चर्चा आहे. मगर यांना नाशिक जिल्ह्यातील अधीक्षकपदावर नियुक्ती देण्यात येणार असल्याचे कळते. त्यांच्या जागी पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांची ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transfers of police officers superintendent of police post vidarbha nagpur police tmb 01
First published on: 05-10-2022 at 11:54 IST