बुलढाणा : समाज कल्याण कार्यालयामार्फत आज बुलढाणा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे शासकीय वसतीगृहात तृतीयपंथीय स्मृतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समान हक्क, संवेदनशील व सन्मानावर भर देण्यात आला. २० नोव्हेंबर २००५ हा दिवस तृतीयपंथीय समुदायाला भेडसावणाऱ्या अन्याय, भेदभाव आणि हिंसाचाराच्या विरोधात नोंद झालेल्या घटनांच्या स्मरणार्थ पाळला जातो. त्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा अधिकृत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
बाल कल्याण समिती सदस्य ऍड. अनुराधा वावगे यांनी तृतीयपंथीयांसाठी उपलब्ध कायदे, दस्तऐवजांमध्ये होणारे बदल, शिक्षण, आरोग्य, आर्थिक मदत आणि इतर योजनांची माहिती दिली. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. डांगे यांनी १८ वर्षाखालील तृतीयपंथीय बालकांचाही “बाल” या श्रेणीत समावेश असल्याचे सांगून अशा बालकांसाठी उपलब्ध शासकीय योजनांची माहिती दिली. तृतीयपंथीयांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन कायम पाठिशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
प्रास्ताविकात समाजकल्याण निरीक्षक गीता केदार यांनी, तृतीयपंथीय हक्क अधिनियम २०१९ मधील प्रमुख तरतुदी, हक्क संरक्षण, शासनाच्या जबाबदाऱ्या आणि तृतीयपंथीयांना मिळणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. समाजातील भेदभाव, अपमानास्पद वर्तन, तसेच तृतीयपंथीयांना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख करून समाजमान्यता आणि समान संधी उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
तृतीयपंथीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सनावर कुरेशी यांनी शासनाने दिलेल्या संधीबद्दल आभार मानले. अमरसिंग राठोड (आम्रपाली) यांनी समाजाकडून मिळणाऱ्या भेदभावपूर्ण वागणुकीचे अनुभव सांगत, आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत असल्याने मिळालेल्या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त केले. मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी रोशन गवई यांनी सर्व नागरिकांना समान हक्क व अधिकार आहेत, तृतीयपंथीयही त्याला अपवाद नाहीत, मानवता हाच खरा धर्म असल्याचे सांगत संवेदनशीलतेचे आवाहन केले.
पोस्टर स्पर्धा
कार्यक्रमामध्ये पोस्टर डिझाईनिंग स्पर्धा घेण्यांत आली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. पुजा शिंगणे, व्दितीय क्रमांक स्नेहल तायडे व तृतीय क्रमांक शितल अनिल माने याना बक्षिस वितरित करण्यात आले.
