नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नागपूर : शहरात मोठय़ा प्रमाणात कचरा निर्माण होत असताना पूर्व आणि दक्षिण नागपुरातील अनेक भागात कचरा संकलन केंद्र रुग्णालय परिसरात करण्यात आले. यामुळे रुग्णांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा संकलक बीव्हीजी आणि एव्हीजी कंपन्याचे कर्मचारी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचे ऐकत नाहीत. त्यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे.

सक्करदरा चौकाला लागून शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय असून तेथे मोठय़ा प्रमाणात रुग्ण आहेत. शिवाय अनेक खाजगी रुग्णालय या परिसरात आहेत. रुग्णालयाला लागूनच असलेल्या जागेवर बीव्हीजी कंपनीने कचरा संकलन केंद्र तयार केले आहे. येथे परिसरातील नागरिकांकडून गोळा केलेला कचरा आणून टाकतात. शिवाय श्री बिंझाणी महाविद्यालयासमोर चार खाजगी रुग्णालय आहेत. बाजूला खेळण्याचे मैदान आहे. या ठिकाणी मोकळ्या जागेवर कचरा संकलन केंद्र तयार केले आहे. सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू मार्गावर दारोडकर चौकात रुग्णालयासमोर कचरा जमा केला जात असून काही दिवसांपासून तेथेही कचराघर तयार करण्यात आले. विशेष म्हणजे, या ठिकाणी बाजूला शाळा आहे. वाठोडा, हिवरीनगर या भागातील खाजगी रुग्णालयासमोर कचरा संकलन केंद्र तयार झाले आहे. महावीरनगर, गणेशनगर, रेशीमबाग, मानेवाडा, गुरुदेवनगर, भांडे प्लॉट या परिसरात अनेक भागात रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून येतात.

दोन दोन दिवस तेथील कचरा उचलला जात नाही. त्यामुळे पाऊस आला की हा कचरा रस्त्यावर येतो आणि परिसरात दुर्गंधी पसरते. आयुर्वेदिक रुग्णालयाच्या भिंतीला लागून असलेला कचरा सुद्धा अनेकदा रस्त्यावर येऊन अनेकांच्या दुकानासमोर पसरतो. या संदर्भात नेहरूनगर व हनुमाननगर झोनमध्ये तक्रारी करण्यात आल्या. मात्र कुठहीच कार्यवाही होत नाही. गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका परिणिता फुके यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर  सर्वच पक्षाच्या सदस्यांनी यावरून प्रशासनाला धारेवर धरले होते.

आयुक्तांनी कचरा संकलन केंद्राबाबत नियोजन करण्याचे निर्देश दहाही झोनच्या सहायक आयुक्तांना दिले होते. मात्र प्रत्यक्षात बीव्हीजी व एव्हीजी या दोन कंपन्याकडे कचरा उचलण्याची जबाबदारी दिली असून शहरात कचरा संकलन केंद्र कुठे असावे याबाबत कुठलेही धोरण निश्चित नाही. यामुळे ऐन पावसाळ्यात आता या अवैध कचरा संकलन केंद्रांमुळे नागपूरकर त्रस्त झाले आहेत.

शहरातील विविध भागात कचरा संकलन केंद्र निश्चित करण्यात आले आहे. मात्र रुग्णालयाच्या शेजारी कचराघर असेल संबंधित अधिकाऱ्यांवर  व कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. नागरिक व परिसरातील दुकानदारांनी कचरा जमा केल्यानंतर तो कचरा गाडीत टाकावा, इतरत्र फेकू नये.  

डॉ. गजेंद्र महल्ल्ले, नोडल आरोग्य अधिकारी, महापालिका.