नागपूर : मानवी शरीरात चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे जिवाणू (बॅक्टेरिया) असतात. यापैकी चांगल्या जिवाणूच्या मदतीने भविष्यात काही आजारांवर उपचार शक्य असल्याचे संकेत सेंट्रल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (सिम्स)च्या संशोधनातून मिळत आहेत, अशी माहिती सिम्सच्या संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. राजपाल सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सिम्स रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेला संचालक डॉ. लोकेंद्र सिंग उपस्थित होते. या संशोधनासाठी २१८ नागरिकांच्या शौचाचे नमूने तपासले गेले. त्यात ६० टक्के नमुने शहरी तर ४० टक्के नमुने ग्रामीण भागातील होते. बहुतांश नमुने हे मध्य भारतातील रुग्णांचेच होते. या नमुन्यातील ‘डीएनए’चा सूक्ष्म अभ्यास केला गेला. एका व्यक्तीच्या शरीरातील चांगले जिवाणू इतरांमध्ये प्रत्यारोपीत करून काही आजारांवर उपचार शक्य असल्याचे यातून पुढे आले.

हे संशोधन सध्या प्राथमिक स्तरावर आहे. भविष्यात व्याप्ती वाढल्यानंतर या संशोधनाचा रुग्णांना मोठा लाभ होऊ शकतो, असे डॉ. कश्यप यांनी सांगितले. डॉ. लोकेंद्र सिंग म्हणाले, आजाराची उत्पत्ती पोटाच्या विकारातून होत असल्याचे प्राचीन काळापासून बोलले जाते. आयुर्वेदात खानपानासह पोटाच्या विकारांना खूप महत्त्व दिले गेले आहे. या संशोधनातून त्याला जोड मिळाली. शौचाच्या अभ्यासातून पक्षाघात, मिरगी, अर्धागवायूसह इतरही आजारांची जोखीम कळणे शक्य असल्याचे प्राथमिक निरीक्षण संशोधनातून पुढे आले आहे, असेही त्यांनी सांगितले. मध्य भारतात पहिल्यांदाच हे संशोधन झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला. पत्रपरिषदेत रिमा बिस्वास यांच्यासह संशोधनाशी संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.

शहरी भागात आजाराचा सर्वाधिक धोका

संशोधनासाठी तपासलेल्या शौचाच्या नमुन्यात ग्रामीण भागातील नमुन्यामध्ये फारसे काही आढळून आले नाही. परंतु शहरी भागात मधुमेहासह इतरही बरीच जोखीम नागरिकांमध्ये असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या संशोधनाद्वारे भविष्यात उद्भवणाऱ्या आजाराची ओळख पटवून धोका टाळणे शक्य असल्याचे सिम्सच्या संशोधकांचे म्हणणे आहे.