अमरावती जिल्‍ह्यात डेंग्‍यूबाधित रुग्‍णांची संख्‍या वाढू लागली असून खाटा नसल्याने रुग्‍णांना  जमिनीवर झोपवून उपचार करण्‍यात येत असल्‍याचे धक्‍कादायक चित्र मेळघाटातील चिखलदरा तालुक्‍यातील जामली या गावात दिसून आले आहे. यामुळे आरोग्‍य विभागाचा गलथान कारभार उघड झाला आहे.जामली आर या गावात गेल्‍या आठवड्यात दुषित पाण्‍यामुळे दीडशेहून अधिक आदिवासी गावकऱ्यांना जलजन्‍य आजाराची लागण झाली. वीस दिवसांमध्‍ये दहा जणांचा मृत्‍यू झाल्‍याने गावात भीतीचे वातावरण पसरले होते. त्‍यातच आता गावात डेंग्‍यूबाधित रुग्‍णांची संख्‍या वाढू लागली आहे.

गावात सहा डेंग्‍यूबाधित रुग्‍ण आढळून आले असून त्‍यात सर्वाधिक महिला आहेत. या रुग्‍णांवर जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत जमिनीवर झोपवून उपचार केले जात आहेत. या रुग्‍णांसाठी बेडची व्‍यवस्‍था करण्‍यात आरोग्‍य यंत्रणा अपयशी ठरली आहे.गेल्‍या आठवड्यात जामली गावात जलजन्‍य आणि कीटकजन्‍य आजाराने थैमान घातले. एकूण दहा रुग्‍णांपैकी सहा रुग्‍णांचा मृत्‍यू हा वृद्धापकाळाने तर चार जणांचा मृत्‍यू हा अतिसाराची लागण झाल्‍याचे समोर आले होते.

हेही वाचा >>>शरद पवारांचे एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र; सरकारला इशारा देत म्हणाले…

त्‍यामुळे गावातील विहिरीचा पाणीपुरवठा पूर्णत: बंद करण्‍यात आला. जलवाहिनीतून गळती होत असल्‍याने दुषित पाण्‍याचा पुरवठा झाल्‍याचा संशय व्‍यक्‍त करण्‍यात आला. या गावात तूर्तास टँकरने पाणीपुरवठा करण्‍यात येत आहे.टेंब्रुसोंडा प्राथमिक आरोग्‍य केंद्राअंतर्गत जामली येथे आरोग्‍य उपकेंद्र आहे. पण, या ठिकाणी जागा अपुरी आहे, त्‍यामुळे जिल्‍हा परिषद शाळेच्‍या खोलीत रुग्‍णांवर उपचार केले जात आहेत. दोन हजार लोकसंख्‍येच्‍या गावात कायमस्‍वरूपी आरोग्‍य सेविका नाही, कंत्राटी आरोग्‍य सेविकेवर येथील उपकेंद्राची जबाबदारी आहे. या ठिकाणी आरोग्‍य कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करावी आणि आरोग्‍य केंद्राचा विस्‍तार करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अनेकवेळा उपकेंद्रात विद्युत पुरवठा नसल्‍याने रात्री रुग्णांना घरी परतावे लागत असल्‍याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा >>>बुलढाणा : राहुल गांधींची जीभ कापणाऱ्यास ११ लाखांचे बक्षीस; संजय गायकवाड यांची प्रक्षोभक घोषणा

मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल आणि राज्‍यसभा सदस्‍य डॉ. अनिल बोंडे यांनी नुकतीच जामली या गावाला भेट देऊन आरोग्‍य विभागाच्‍या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि आदिवासींसोबत संवाद साधला. जामली गावात जलजीवन मिशनमार्फत जलवाहिनी अंथरण्‍यात आली आहे. या जलवाहिनीचे काम निकृष्‍ट दर्जाचे झाल्‍याने डॉ. अनिल बोंडे यांनी संताप व्‍यक्‍त केला. या कामाची चौकशी करण्‍याचे निर्देश त्‍यांनी संबंधित विभागाला दिले.  आरोग्‍य यंत्रणा सध्‍या गावात तळ ठोकून आहे.