रेटिना तज्ज्ञांचा राजीनामा

महेश बोकडे

नागपूर : विदर्भातील मेडिकल आणि मेयो या दोनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत प्रत्येकी एक ‘वेट्रीओ रेटिना यूव्हीया’ तज्ज्ञ सेवारत होते. यापैकी मेडिकलच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. वंदना अय्यर यांनी राजीनामा दिल्याने येथील दृष्टिपटलावरील उपचार बंद झाले. मेयोत तज्ज्ञ असले तरी यंत्र नसल्याने तेथील उपचारही बंद आहे. त्यामुळे विदर्भातील शासकीय रुग्णालयात सध्या दृष्टिपटलावरील उपचार थांबले आहेत.

नागपुरात मेडिकल आणि मेयो ही दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये आहेत. अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदियासह नागपुरातील दोन, असे विदर्भात एकूण ६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत.प्रत्येक महाविद्यालयात स्वतंत्र नेत्र विभाग असला तरी ‘वेट्रीओ रेटिना यूव्हीया’ तज्ज्ञ नाही. एमबीबीएस पदवीनंतर एमएस पदव्युत्तर अभ्यासक्रम केलेले तज्ज्ञ रेटिना विषयात फेलोशिप करतात. त्यानंतर या तज्ज्ञांना डोळ्याच्या दृष्टिपटलावरील (रेटिना) गुंतागुंतीचे उपचार करणे शक्य होते.

नागपुरातील मेडिकल आणि मेयो हे दोन रुग्णालय वगळता इतर एकाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेटिना तज्ज्ञ नाही. दरम्यान, मेडिकलच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. वंदना अय्यर आणि इतर काही तज्ज्ञांची कंत्राटी नियुक्ती झाल्यावर प्रशासनाने सुमारे ५० लाखांचे व्हिट्रेक्ट्रॉमी यंत्र, २५ लाखांचे ओसीटी यंत्र, ३५ लाखांचे लेझर यंत्र, २० लाखांचे फंगस कॅमेरासह इतर साहित्य, असे सुमारे दीड कोटींचे यंत्र खरेदी केले. त्यानंतर विदर्भात केवळ नागपुरातील मेडिकलमध्ये दृष्टिपटलावरील उपचार सुरू झाले. दरम्यान, मेयोतही एका डॉक्टरची नियुक्ती झाली, परंतु यंत्र नसल्यामुळे तेथे उपचार होत नाही. डॉ. वंदना अय्यर यांची ‘एम्स’मध्ये नियुक्ती झाल्यामुळे त्यांनी मेडिकलचा राजीनामा दिला. त्यामुळे मेडिकलमधील उपचारही बंद झाले आहेत.

लवकरच नवीन नियुक्ती

“मेडिकलमधील एकमात्र रेटिना तज्ज्ञ असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांनी राजीनामा दिला, परंतु अद्याप तो मंजूर करण्यात आला नाही. या विषयातील तज्ज्ञांची लवकरच नियुक्ती करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विदर्भातील रुग्णांवर दृष्टिपटलावरील उपचार शक्य होईल.”- डॉ. राजेश जोशी, विभागप्रमुख, नेत्ररोग विभाग (मेडिकल), नागपूर.

 ‘या’ रुग्णांसाठी रेटिना तज्ज्ञ हवेत

हल्ली मोबाईलसह इतर काही कारणांमुळे नेत्राशी संबंधित रुग्ण वाढत आहे. त्यातच गरिबांना डोळ्यांवरील उपचारासाठी सरकारी रुग्णालय हाच पर्याय आहे. विदर्भात केवळ मेडिकलमध्येच रेटिना तज्ज्ञ व अद्ययावत यंत्र असल्याने येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. विदर्भातील विविध जिल्ह्यांसह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातील रुग्णांची येथे उपचारासाठी गर्दी होते. मधुमेहाच्या रुग्णांच्या डोळ्यात गुंतागुंत वाढली, रुग्णाच्या डोळ्याचा पडदा सरकला, डोळ्यात रक्ताच्या गुठळ्या जमल्यास रेटिना तज्ज्ञच उपचार करू शकतात.