चंद्रपूर : वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा चंद्रपूरचा ‘ट्री बॉय’ अजिंक्य कायरकर याचे नाव विशेष सखोल पुनःरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेतून वगळले जाणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे. मतदार यादीतील नोंदींमध्ये त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करण्याऐवजी संबंधित मतदारांनाच कागदपत्रांचा गठ्ठा घेऊन आपली ओळख सिद्ध करण्याची वेळ येत असेल, तर प्रशासनाच्या नोंदणीतील चुका कोण दुरुस्त करणार, असा बोचरा प्रश्न अजिंक्यचे वडील, इरई नदी बचाव जनआंदोलनाचे जनक तथा ‘वृक्षाई’चे संस्थापक कुशाब कायरकर यांनी उपस्थित केला आहे.
अजिंक्य कायरकर याने लहान वयापासून वृक्षारोपणाचा ध्यास घेतला. चंद्रपूरसह विदर्भ, महाराष्ट्र आणि देशभरात त्याच्या पर्यावरणविषयक कार्याची दखल घेतली गेली. प्रत्येक वाढदिवशी तसेच ५ जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून त्याने वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला. त्याच्या या कार्याची दखल तत्कालीन राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी घेतली होती. अजिंक्यच्या आठव्या आणि दहाव्या वाढदिवसानिमित्त कलाम यांनी शुभेच्छापत्र पाठवून त्याला आशीर्वाद दिल्याचे कायरकर यांनी सांगितले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, योगगुरू बाबा रामदेव तसेच तत्कालीन केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनीही अजिंक्यासोबत वृक्षारोपण केले होते. दरम्यान, अजिंक्यला २५ सप्टेंबर २०२५ रोजी भारत निवडणूक आयोगाकडून SIR प्रक्रियेसंदर्भातील नोटीस प्राप्त झाली आहे.
त्यानुसार २९ सप्टेंबर २०२६ रोजी कुशाब कायरकर यांना संबंधित अधिकाऱ्यांसमोर आवश्यक कागदपत्रे सादर करून स्वतःची ओळख सिद्ध करावी लागणार आहे. कायरकर यांच्या म्हणण्यानुसार, मागील SIR प्रक्रियेच्या वेळी अजिंक्य अवघ्या सहा वर्षांचा होता. त्याचे मतदार ओळखपत्र ११ जानेवारी २०१६ रोजीचे असून, त्यावर इंग्रजीतील संपूर्ण नाव योग्यरीत्या नमूद आहे. त्यामुळे मतदार यादी तयार करताना किंवा नोंदणी प्रक्रियेत झालेल्या संभाव्य स्पेलिंग अथवा अन्य त्रुटींची किंमत आता मतदारांनीच का मोजावी, असा सवाल त्यांनी केला आहे. ‘मूल-मुलगी आमचेच असल्याचेही मतदारांनी सिद्ध करायचे का?’ असा उपरोधिक सवाल करत कायरकर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मतदार नोंदणी करताना झालेल्या त्रुटी संबंधित यंत्रणेनेच तपासून दुरुस्त कराव्यात. प्रत्येक चुकीसाठी सामान्य नागरिकांना कागदपत्रांची जुळवाजुळव करीत कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
