नागपूर : उपराजधानीत गेल्या दहा वर्षात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. मात्र, महापालिकेतील उद्यान विभागाच्या लेखी असलेली वृक्षतोडीची संख्या अचंबित करणारी आहे. गेल्या तीन वर्षात केवळ दोन हजार ११५ झाडे कापली गेली, असे हा विभाग सांगतो. प्रत्यक्षात अवैधरित्या कापल्या गेलेल्या झाडांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक आहे.

एक झाड तोडण्यासाठी ठराविक रक्कम जमा करून मोबदल्यात पाच झाडे लावावी लागतात. त्यानंतरच महापालिकेच्या उद्यान विभागाकडून ते झाड तोडण्यासाठी परवानगी दिली जाते. गेल्या तीन वर्षात या विभागाकडून २११५ झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली. त्यासाठी विभागाकडे एक कोटी १२ लाख ५४ हजार १०० रुपये इतकी रक्कम जमा झाली. मात्र, या झाडांच्या मोबदल्यात जी ९५ हजार ५१५ झाडे लावण्यात आली, त्यातील तब्बल ३९ हजार ३४७ झाडे जगलीच नाहीत. त्यामुळे मोबदल्यात लावण्यात येणाऱ्या झाडांची पाहणी उद्यान विभाग खरोखरंच गांभीर्याने करतो काय, असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी उपस्थित केला आहे.

शहरात पुरातन वृक्ष वाढल्याचा दावा महापालिकेच्या सर्वेक्षणात करण्यात आला असला तरीही प्रत्यक्षात ही वाढ कुठे दिसून येत नाही. तुलनेने वृक्षतोडीच्या खाणाखुणा शहरात सर्वत्र दिसून येत आहेत.

गेल्या दीड वर्षात सुमारे १३ गुन्हे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवले गेले आहेत, तर सुमारे १९ प्रकरणे न्यायालयात आहेत.

वर्ष – वर्षनिहाय कापलेली झाडे – जमा रक्कम – लागवड केलेली झाडे – न जगलेली झाडे

२०१९-२० – ७७८ नग – ५४ लाख ८९ हजार – ५७ हजार ५४६ – २४१६९

२०२०-२१ – १०२४ नग – ३९ लाख ८७ हजार ५०० – १७ हजार ४९४ – १०५०

२०२१-२२ – ३१३ नग – १७ लाख ७७ हजार ६०० – २० हजार ४७५ – १४ हजार १२८

अवैध वृक्षतोडीविरोधात दाखल गुन्हे

पोलीस ठाणे – गुन्हे संख्या

सीताबर्डी – ३

अंबाझरी – २

अजनी – २

गिट्टीखदान – २

धंतोली – १

बजाजनगर – १

राणाप्रतापनगर – १