गोंदिया : सालेकसातील कचारगड येथे आज ३० जानेवारीपासून आदिवासी बांधवांची यात्रा सुरू झाली. मात्र, यात्रेसंदर्भात लावण्यात आलेल्या मोठमोठ्या फलकांवर ‘देवा भाऊ आदिवासी विकास कचारगड यात्रा’ असा उल्लेख केल्याने आदिवासी समाजातून संताप व्यक्त होत आहे. पारंपरिक आणि ऐतिहासिक यात्रेच्या मूळ नावात बदल आणि राजकीय, वैयक्तिक नावांचा समावेश झाल्याने आदिवासी बांधवांनी नाराजी व चिंता व्यक्त केली आहे.

सालेकसा तालुक्यातील कोसमतरा–धनेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेली कचारगड ही भूमी केवळ एक धार्मिक स्थळ नसून, ती संपूर्ण देशभरातील आदिवासी समाजाच्या उत्पत्तीची, अस्मितेची व संस्कृतीची पवित्र ओळख मानली जाते. दरवर्षी माघ पौर्णिमेच्या दिवशी येथे भरविण्यात येणारी माँ काली–कंकाली–पारिकुपार लिंगो कचारगड यात्रा ही आज ‘आदिवासी महाकुंभ’ म्हणून देशभर ओळखली जाते.

या यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून लाखो आदिवासी बांधव कचारगड येथे उपस्थित राहून आपल्या पूर्वजांना अभिवादन, तसेच माँ काली–कंकाली–पारी कुपारलिंगो देवस्थानाचे दर्शन घेतात. श्रद्धा, परंपरा, निसर्गपूजन आणि सामूहिक एकतेचे हे प्रतीक असलेली यात्रा आदिवासी समाजासाठी भावनिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व राखून आहे.

१९८६ मध्ये प्रथमच कचारगड येथे या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ही जत्रा एक दिवसाची होती. मात्र वर्षागणिक भाविकांची वाढती संख्या, देशभरातून येणारा प्रतिसाद आणि यात्रेचे वाढते महत्त्व लक्षात घेता आज ही यात्रा पाच दिवसांची झाली आहे. स्थानिक नागरिक व आदिवासी बांधवांच्या मते, भविष्यात भाविकांची वाढती गर्दी पाहता ही यात्रा नऊ दिवसांपर्यंत चालण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

याआधीही कचारगड देवस्थान समिती विविध कारणांमुळे विवादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. त्यातच यात्रेच्या नावावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाल्याने, ही बाब केवळ नावापुरती मर्यादित नसून ती आदिवासी अस्मिता, परंपरा व श्रद्धेशी जोडलेली असल्याचे मत समाजातून व्यक्त होत आहे.

कचारगड ही जागा कोणत्याही एका व्यक्तीची किंवा संस्थेची नसून, ती संपूर्ण आदिवासी समाजाची सामूहिक वारसा स्थळ आहे. त्यामुळे या यात्रेच्या नावात, स्वरूपात किंवा व्यवस्थापनात कोणताही बदल करताना सर्व आदिवासी संघटना, समाज बांधव, ज्येष्ठ नागरिक व स्थानिक ग्रामसभा यांचा विश्वासात घेणे आवश्यक असल्याची भावना तीव्र होत आहे.

या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची संवेदनशीलतेने दखल घ्यावी, यात्रेचे ऐतिहासिक नाव, परंपरा व धार्मिक स्वरूप अबाधित राहील याची खात्री करावी, तसेच कोणत्याही प्रकारचा सामाजिक तणाव निर्माण होणार नाही यासाठी तटस्थ व समन्वयाची भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.

कचारगड यात्रा ही केवळ एक जत्रा नसून, ती आदिवासी समाजाच्या अस्तित्वाची, इतिहासाची व एकतेची ओळख आहे. त्यामुळे या पवित्र यात्रेचा सन्मान राखणे ही प्रशासन, आयोजक व समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.यापूर्वीही विविध समस्या व आरोपांमुळे चर्चेत राहिली आहे. अशा परिस्थितीत, यात्रेच्या पारंपरिक ओळखीपासून दूर जाऊन ‘देवा भाऊ आदिवासी विकास पर्व’ या नावाचा वापर करण्यात आल्याने प्रकरणाला आणखी एक नवा वाद निर्माण झाला असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

कचारगड यात्रा ही आदिवासी श्रद्धा व परंपरेशी जोडलेली असून, बॅनरद्वारे कार्यक्रमाला वेगळे वळण देणे योग्य नाही. ‘देवा भाऊ आदिवासी विकास कचारगड यात्रा’ या नावाच्या बॅनरचा आम्ही निषेध करतो. – नामदेव आंचले, आजीवन सदस्य, कचारगड देवस्थान यात्रा समिती.

मी सालेकसाकडे येताना रस्त्यांवर अशा प्रकारचे बॅनर पाहिले. हे अत्यंत लज्जास्पद असून आदिवासी समाजाच्या भावना दुखावणारे आहे. कचारगड यात्रेसारख्या पवित्र व परंपरागत कार्यक्रमाशी असे नाव जोडणे योग्य नाही. – लीनाताई उईके, आजीवन सदस्य, कचारगड देवस्थान यात्रा समिती.

माँ काली–कंकाली–कुपारलिंगो या नावाने कचारगड यात्रा अनेक वर्षांपासून सुरू आहे. या पवित्र यात्रेचे पारंपरिक नाव बदलून ‘देवा भाऊ आदिवासी पर्व’ असे बॅनर लावणे अत्यंत दुर्दैवी व अयोग्य आहे. अशा प्रकारचे कृत्य आदिवासी समाजाच्या परंपरा व श्रद्धेचा अपमान करणारे असून, ते लज्जास्पद आहे. – शंकर मडावी, आदिवासी सेवक, कचारगड देवस्थान समिती.