scorecardresearch

आठ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसह १२७ आदिवासी जोडपी रविवारी होणार विवाहबद्ध

चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉन येथे सकाळी १० वाजता हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

marriage
(फोटो सौजन्य- संग्रहित छायाचित्र, लोकसत्ता)

लोकसत्ता टीम

नागपूर: मैत्री परिवार संस्था नागपूर व गडचिरोली शाखा तसेच, गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकी यांच्या संयुक्त विद्यमाने २६ मार्च रोजी गडचिरोली येथे भव्य सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात आत्मसमर्पण केलेल्या ८ नक्षलवाद्यांसह १२७ आदिवासी युवक-युवती विवाहबद्ध होणार असल्याची माहिती नक्षल सेलचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील व मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी दिली.

चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉन येथे सकाळी १० वाजता हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मैत्री परिवारने गडचिरोली जिल्हा दत्तक घेतला असून पोलीस विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील विविध भागात दिवाळी सण साजरा करण्यासोबतच विविध उपक्रम राबवले जातात. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील युवक-युवतींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने व नक्षलवादामुळे भयग्रस्त या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी, दहशतमुक्त व हिंसामुक्त सामाज निर्माण करण्याच्या हेतूने हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आतापर्यंत १५ आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांसह एकूण ४३३ आदिवासी युवक-युवतींचे विवाह पार पडले आहे. या पाचव्या सामूहिक विवाह सोहळ्याला गडचिरोली व नागपूर येथील अनेक मान्यवर, गडचिरोली पोलीस दलाचे अधिकारी आणि मैत्री परिवार संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आणखी वाचा- भंडारा : धक्कादायक! सिरेगावटोला येथील अख्खे आदिवासी कुटुंब १६ दिवसांपासून बेपत्ता

या सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण १२७ आदिवासी युवक-युवतींचे विवाह होणार असून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या ८ नक्षलवादी जोडप्यांचे विवाह हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. २५०० लोकांची बसण्याची क्षमता असलेला भव्य मंडप तयार करण्यात आला आहे. शिवाय विवाह सोहळ्यासाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात येत आहे. यात ३५०० लोकांच्या बसण्याची व्यवस्था राहणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या या उपवर-वधूंची १० झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

आत्मसमर्पित नक्षलवादी उपवर-वधूंसाठी ‘नवजीवन’ हा स्वतंत्र झोन तयार करण्यात आला आहे. प्रत्येक मंडपाला आदिवासी जमातीतील दैवत व शूरवीर पुरुषांची नावे देण्यात आली आहेत. विवाह सोहळ्यानंतर त्यांच्या रोजगारांची आणि त्यांना संसारासाठी लागणाऱ्या वस्तूंची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय नवविवाहित जोडप्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक जोडप्यांच्या अकरा लोकांना आमंत्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रा. प्रमोद पेंडके, दत्ता शिर्के उपस्थित होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 09:43 IST

संबंधित बातम्या