scorecardresearch

गडचिरोलीत ११९ आदिवासी जोडपे विवाहबंधनात

आदिवासी परंपरेनुसार १६ आत्मसमर्पित नक्षल्यांसह ११९ जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा गडचिरोलीत पार पडला.

१६ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा समावेश

नागपूर : आदिवासी परंपरेनुसार १६ आत्मसमर्पित नक्षल्यांसह ११९ जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा गडचिरोलीत पार पडला. पायजामा, पिवळय़ा रंगाचे उपरणे आणि टोपी या वेशातील ११९ आदिवासी उपवर आणि पिवळय़ा रंगाच्या साडीतील उपवधूंची भव्य मिरवणूक मुख्य रस्त्यातून निघाली. यावेळी गडचिरोलीकरांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. उपवर-वधूंचे जागोजागी स्वागत करण्यात आले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या सोहळय़ाचे गडचिरोलीकरांनी तोंडभरून कौतुक केले. 

मैत्री परिवार संस्था नागपूर व गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकी यांच्या संयुक्त प्रयत्नातून रविवारी गडचिरोली येथील अभिनव लॉनममध्ये हा सामूहिक विवाह सोहळा मोठय़ा उत्साहात पार पडला. ११९ जोडपी, त्यांचे नातेवाईक, गावकरी, आमंत्रित अशा सुमारे तीन हजारांच्या संख्येने उपस्थित लोकांनी भव्य मंडप फुलून गेला होता. रविवारी सकाळी सहा वाजताच लग्न मंडपात लगबग सुरू झाली. वर-वधू नटूनथटून बसले होते तर भूमक विवाह विधीची तयारी करण्यात व्यस्त होते. आठ वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. बँडबाज्यांसह सुमारे अडीच किलोमीटर फिरून आल्यानंतर दहा वाजता मुहूर्तावर भूमकांच्या मंत्रोच्चारात विवाह विधी पार पडला.

त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाला आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजभिये, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अभियान सोमय मुंडे, एसडीपीओ प्रणील गिल्डा, नागरी कृती शाखेचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सामाजिक कायकर्ते व गुरुदेव सेवा मंडळाचे डॉ. शिवनाथ कुंभारे, नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा बँक अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, मैत्री परिवारचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, बाळासाहेब वरखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविकातून प्रा. संजय भेंडे यांनी मैत्री परिवारच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. माधुरी यावलकर व महादेव शेलार यांनी केले. आभार प्रणील गिल्डा यांनी मानले.

आदिवासी आमचेच कुटुंबीय 

गडचिरोली जिल्हा हा नक्षली कारवायांसाठी ओळखला जातो. या अतिसंवेदलशील जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात हिंसक घटना घडत असतात. अशा नक्षली कारवायांना आळा घालण्यासाठी एकीकडे पोलीस विभाग प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे, पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वाच्या जीवन विकासासाठी सातत्याने झटत आहे. हे आदिवासी आमचेच कुटुंबीय असून त्यांना मदत करणे हे आमचे आद्यकर्तव्य आहे, असे सांगत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नवविवाहित जोडप्यांना सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.  

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tribal couples married gadchiroli inclusion surrendered naxalites ysh

ताज्या बातम्या