नागपूर : सी २० परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांनी गुढीपाडव्या मुहुर्तावर देवलापारच्या गोविज्ञान संशोधन केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांचे आदिवासी महिलांनी पारंपरिक गोंडी नृत्याने स्वागत केले. या नृत्यावर विदेशी पाहुण्यांनाही मोह आवरला नाही. त्यांनीही या नृत्यावर ठेका धरला आणि नंतर गुढी उभारली.
दोन दिवसांच्या परिषदेनंतर बुधवारी सकाळी विदेशी पाहुण्यांनी देवलापार येथील गो विज्ञान अनुसंधान केंद्राला भेट देत तेथील विविध प्रकल्पाची पाहणी केली. प्रारंभी पाहुण्याच्या हस्ते गो मातेची पूजा करण्यात आली. रामटेक तालुक्यातील देवलापार येथील गोविज्ञान संशोधन केंद्राने देशी गोवंशाचा विकास हे प्रमुख उद्दिष्ट ठेवले आहे. दुधाएवढेच शेण आणि गोमूत्र हे घटकही महत्त्वाचे असून ते उत्पन्नाचा भक्कम पर्याय ठरू शकतात हेच संस्थेने विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीतून सिध्द केले आहे. त्याच दृष्टीने देशपातळीवरील संस्थांशी तंत्रज्ञानाबाबत करार करून विविध उत्पादने तयार केली आहेत. काही उत्पादनांना आंतरराष्ट्रीय पेटंटही मिळवण्यात संस्था यशस्वी ठरली आहे.