नागपूर : मागील काही वर्षात  दहा लाखांहून अधिक नैसर्गिक प्रजाती संपूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. येत्या काळात आणखी काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या जतनासाठी आदिवासी समुदायाचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. त्याच अनुषंगाने ‘आदिवासी फॉर फॉरेस्ट’ या अभियानाअंतर्गत आदिवासी समुदायाच्या पुढाकाराने जंगल निर्माणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

आदिवासी समुदायावरील अन्याय दूर करण्यासाठी व आदिवासी समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा २००६ च्या प्रभावी अंमलबजावणीचे अभियान वातावरण फाऊंडेशन, कॅनडियन प्रशासन, विकास सहयोग प्रतिष्ठान, अमेरिका स्थित कॅडस्टा फाऊंडेशनने हाती घेतले आहे. आदिवासी समुदायाचे उत्पादनाचे प्रमुख साधन हे निसर्गाधिष्ठित व जंगलाधारित राहात आले आहे. निश्चितच या अभियानामुळे या समुदायाचे जीवनमान, त्यांच्या जगण्याचे साधन आणि अस्तित्वात असलेल्या जंगलाचे संरक्षण होऊ  शकणार आहे. आदिवासी समुदायात निसर्ग संगोपन व संरक्षणाची परंपरा आहे. हीच परंपरा मजबूत करण्यासाठीचे हे अभियान आहे. रायगड जिल्ह्यातील आदिवासी समुदायाचे स्थलांतर हा गंभीर विषय आहे. त्यामुळे या अभियानाची सुरुवात देखील याच जिल्ह्यातून करण्यात येत आहे. आदिवासी समुदाय हा समाजाच्या मुख्य धारेपासून नेहमी वंचित राहिलेला घटक आहे. या समुदायात शिक्षणाचे प्रमाणही अपवादानेच आढळते. स्थलांतर व कुपोषणासारख्या गंभीर समस्याही या समाजात दिसून येतात. शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नती पासून वंचित असलेल्या आदिवासी समुदायासाठी फॉरेस्ट फॉर आदिवासी हे अभियान मूलभूत परिवर्तन करणारे ठरणार आहे. या अभियानाची जाहीर घोषणा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी  ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून केली. यावेळी कॅनडीयन प्रशासनाचे मायकल वॉक, वातावरण फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक भगवान केसभट्ट, वॉशिंग्टनमधील कॅडस्टा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एँमी बुत्कोर्ट, विकास सहयोग प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन सुर्वे आदी उपस्थित होते.

रायगड जिल्हा प्रशासन व वातावरण फाऊंडेशनच्या समन्वयाने सुरू  होणाऱ्या या अभियानास अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड असल्यामुळे हे अभियान अनेकार्थांनी महत्त्वाचे ठरणार आहे.

अदिती तटकरे, पालकमंत्री रायगड जिल्हा.

वातावरण फाऊंडेशन बरोबर असणारा रायगड जिल्हा प्रशासनाचा समन्वय हा एक महत्त्वपूर्ण भागीदार आहे. सहकार्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या प्रदेशातील आदिवासी समुदायांच्या शाश्वत प्रगतीसाठी  सहकार्य करणार आहोत.

मायकेल वॉक, कॅनडियन प्रशासन.

या अभियातून आदिवासी समुदायाला प्रशिक्षित करून निसर्ग संपत्तीचे संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन हे ध्येय गाठता येणे शक्य आहे. त्यासाठी कॅनडा हाय कमिशनच्या आर्थिक सहकार्याने या अभियानात आदिवासी समुदायाला वनहक्काचे दावे दाखल करण्यासाठी ठोस पुरावा म्हणून उपग्रह नकाशे तयार करून देण्यासाठी अमेरिका स्थित कॅडस्टा फाऊंडेशन तंत्रिक सहकार्य पुरवणार आहे.

 – भगवान केसभट्ट, मुख्य कार्यकारी अधिकारी, वातावरण फाऊंडेशन.